जनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का
जनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का

जनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का

sakal_logo
By

( पान २ साठी मेन)

फोटो ओळी
-rat१४p१२.jpg-
६२२२५
रत्नागिरी- मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू करण्यासाठी केलेले बेमुदत उपोषण पत्तन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मिऱ्यावासीयांनी मागे घेतले.


जनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का?

आप्पा वांदरकर ; पत्तन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित

सकाळ वृत्तसेवाः
रत्नागिरी, ता. १४ ः मिऱ्या गावच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या पावणेदोनशे कोटीच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला वर्ष झाले तरी एकही दगड लागलेला नाही. शासकीय यंत्रणा नेमकी करते काय? ती आहे तरी कोणाची? सार्वजनिक कामे होण्यासाठी आम्ही काय फक्त उपोषणं करत बसायची का? आणि अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा करायचा. जनता मेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, अशी तिखट प्रतिक्रिया उपोषणकर्ते शांताराम उर्फ आप्पा वांदरकर यांनी दिली. बंधाऱ्याचे काम आठ दिवसात सुरू होईल, असे लेखी आश्वासन पत्तनच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू व्हावे, प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेला जाग येण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आप्पा वांदरकरांसह मिऱ्यावासीयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. ते म्हणाले, मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला सुमारे १६० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी शासनाने दिला आहे. मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर हा बंधारा होणार आहे. या कामाचा आरंभ तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला होता.
मिऱ्या गावाच्या संरक्षणासाठी हा बंधारा होणार आहे. यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणेने घेऊन हे काम जलदगतीने आणि दर्जेदार व्हावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. वर्ष झाले तरी या बंधाऱ्याच्या कामाचा एक दगडही लागलेला नाही. हे काम सुरू व्हावे, म्हणून आज मी बेमुदत उपोषणाला बसलो आहे. दुपारी लगेच पत्तन विभागाचे अधिकारी मला भेटायला आले. त्यांनी काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु मी त्यांच्याकडे लेखी आश्वासन मागितले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावले होते; परंतु एकही अधिकारी येण्यास तयार नाही. आमच्या आखत्यारित हा विषय येत नाही, असे अधिकारी बेधडक सांगत आहेत. मग हा जिल्हा कोण चालवतयं? महसूल विभागाच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो.
पाच दिवसाचा आठवडा झाल्याने अधिकारी शुक्रवारीच जातात आणि सोमवारी उशिरा येतात. कामचुकारपणा सुरू आहे. त्यामुळे आज विकासकामांची ही परिस्थिती आहे. असे कामचुकार आम्हाला नकोत. शासकीय कामे होण्यासाठी आम्ही काय उपोषणच करत बसायची का? अधिकाऱ्याची काही जबाबदारी नाही का? पाठपुरावा करून ठेकेदाराकडून काम कोण करून घेणार? असे अनेक प्रश्न वांदरकर यांनी उपस्थित केले. पत्तन विभागाने ८ दिवसात बंधाऱ्याचे काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेतले.

चौकट
आठवड्यानंतर पूर्ण क्षमतेने सुरू
याबाबत कंत्राटदाराशी चर्चा करण्यात आली आहे. ३ तारखेला पत्तन अभियंत्यांनी कंत्राटदाराच्या प्रतिनिधींशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. काम सध्याच्या स्थितीत सुरू करण्यात आले आहे, असे कार्यकारी अभियंत्यांना यांनी सांगितले. शिवाय एक आठवड्यानंतर संबंधित कंत्राटदार यांनी हे काम पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत कार्यकारी अभियंता (पत्तन अभियंता) यांना आश्वासन दिले आहे.