म्हाप्रळ-आंबेत पुलासाठी व्यापारी संघटना धडकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाप्रळ-आंबेत पुलासाठी व्यापारी संघटना धडकली
म्हाप्रळ-आंबेत पुलासाठी व्यापारी संघटना धडकली

म्हाप्रळ-आंबेत पुलासाठी व्यापारी संघटना धडकली

sakal_logo
By

-rat१४p३४.jpg ः KOP२२L६२३०३ मंडणगड ः म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक बंद असल्याने शहर व्यापारी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले व्यापारी.


म्हाप्रळ-आंबेत पुलासाठी
व्यापारी संघटना धडकली
मंडणगडात आक्रोश मोर्चा ; घोषणांनी शहर दुमदुमले
मंडणगड, ता. १४ ः म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक गेल्या तीन वर्षापासून खंडित असल्याने मंडणगड तालुक्याच्या अर्थकारणाचे चक्र ठप्प होत असल्याने समाजातील प्रत्येक घटक अस्वस्थ आहे. ७ नोव्हेंबरला शहर व्यापारी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात निवेदन देऊन व्यापाऱ्यांची सद्यःस्थिती मांडण्यात आली. याचबरोबर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या विषयासंदर्भात तहसील कार्यालयात चर्चा करण्यासाठी व्यापारी संघटनेला बोलावण्यात आले होते. यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर यांच्या दुकानात सकाळी शहरातील दोनशेहून अधिक व्यापारी एकत्र आले. यानंतर बाजारपेठेतून मोर्चाला सुरवात करण्यात आली. जागृती करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाला जागे करा आंबेत पूल खुला करा, व्यापारी संघटनेचा विजय असो, वेळेचा पैशाचा अपव्यय टाळा आदी घोषणा देत तहसील कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा धडकला. तहसील कार्यालयात तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांची व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी तहसीलदारांसमवेत चर्चा करण्यात आली व एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा इशाराही देण्यात आला. या वेळी शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, उपाध्यक्ष श्रीपाद कोकाटे, नीलेश गोवळे, सचिव कौस्तुभ जोशी, जिल्हा प्रतिनिधी दीपक घोसाळकर, खजिनदार दिनेश साखरे, वैभव कोकाटे यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते. प्रशासनाकडून व राज्यकर्त्यांकडून तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर होत असलेल्या चालढकलीच्या विरोधात येथील जनतेच्या मनात असलेला असंतोष व्यापाऱ्यांनी शहरातून उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चाच्या रूपाने व्यक्त झाला.

व्यापारउदीम ५० टक्क्यांनी खाली
गेल्या तीन वर्षापासून पुलावरील वाहतूक सातत्याने बंद असल्याने तालुक्याचे अर्थकारण थंडावले आहे. सर्व क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडला आहे. शहरातील बाजरपेठेतील व्यापारउदीम ५० टक्क्यांनी खाली आला आहे. ही बाब लक्षात घेता पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.