चिपळूण ः परशुराम घाट बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  परशुराम घाट बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
चिपळूण ः परशुराम घाट बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

चिपळूण ः परशुराम घाट बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

sakal_logo
By

६२३३१
परशुराम घाट बंद करण्यास तीव्र विरोध
चौपदरीकरणाचे काम; ग्रामस्थांना सोसावे लागतात हाल, विद्यार्थ्यांचेही नुकसान
चिपळूण, ता. १४ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगरकटाईसह मातीच्या भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याला परशुराम ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसे झाले तर विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱ्यांनी करायचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुन्हा घाट बंद करण्याचा विचार सुरू झाला आहे; मात्र या वर्षीच्या उन्हाळ्यात आणि त्यानंतरच्या पावसाळ्यात घाट बंद केल्याने मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले असल्याने या वेळी मात्र घाट बंद करण्यास परशुराम घाटात गेले वर्षभर काम सुरू आहे. घाटात डोंगर कापताना यापूर्वी अपघात घडल्याने महिनाभर घाटातील वाहतूक बंद ठेवून कामे करण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात पोखरलेला डोंगर खचल्याने अतिवृष्टीत घाट पुन्हा बंद ठेवावा लागला. परिणामी, अवजड वाहतूक बंद ठेवून ती कळंबस्ते, आंबडस, चिरणीमार्गे लोटेकडे वळवण्यात आली; मात्र यामध्ये सर्वात मोठा फटका हा माथ्यावर वसलेल्या परशुराम ग्रामस्थांना बसला होता. शेती घाटाच्या खाली असल्याने आणि दैनंदिन व्यवहारही चिपळूण बाजारपेठेशी असल्याने साहजिकच घाट बंद कालावधीत त्यांना घरातच अडकून पडावे लागले होते. शिवाय शाळांनाही सुटी दिली गेल्याने विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक नुकसानही झाले होते.
आता घाटातील कामे सुरू होत आहेत. धोकादायक स्थितीत असलेले डोंगर कापण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने तसेच चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलदगतीने होण्यासाठी घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवण्याच्यादृष्टीने प्रशासन विचार करत आहे; मात्र प्रशासनाच्या घाट बंदच्या कृतीवर ग्रामस्थ संतापले आहेत. एकतर गावातून निघणारे सगळे रस्ते चौपदरीकरणात तोडून टाकण्यात आलेले असल्याने आता घाट बंद केल्यानंतर जायचे व यायचे कसे? शाळकरी मुले आहेत, शेतकरी आहेत, नोकरदार आहेत त्यांनी कसे जायचे आणि कसे यायचे? त्याचे उत्तर प्रशासनाने अगोदर द्यावे. ऐन डिसेंबरमध्ये अनेक पर्यटक श्री क्षेत्र परशुराम येथे दर्शनाला येतात. पर्यटनाच्या या हंगामात घाट बंद केल्यावर परशुराममधील जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपली पोटं कशी भरायची? असे सवाल ग्रामस्थांनी केले आहेत.
उन्हाळ्यात परशुराम व पेढे या गावांना जोडणारी पुरातन पाखाडी तोडण्यात आली. तेथे स्कायवॉक ब्रिज बनवून द्यावा म्हणून अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे; मात्र अजूनही त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आमची चूक नसताना आम्हाला पुन्हा दोन महिने क्वॉंरटाईन करणार का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

याआधी नेमके झालेय काय
- गावातून निघणारे सगळे रस्ते तोडले
- याआधी दोन वेळा सोसले हाल
- ४ ऐवजी ३५ किमीचा वळसा
- माथ्यावर वसलेल्या परशुरामला फटका


कोट
मुळातच यावर्षी गेल्या दहा महिन्यात उन्हाळा आणि पावसाळ्यात दोनवेळा दीर्घकाळासाठी घाट बंद ठेवल्याने सर्वात मोठा त्रास हा परशुराम ग्रामस्थांना झाला. चिपळूणला जायचे असेल तर चार किलोमीटरऐवजी थेट लोटे, गुणदेमार्गे ३५ किमीचा वळसा घालावा लागतो. अशा परिस्थितीत आम्ही कसे जगायचे? त्यामुळे घाट बंद करण्यापेक्षा त्यातून पर्याय शोधावा.
- विलास पाटील, परशुराम