स्टार स्वरोजगार संस्थेतर्फे विनामुल्य टेलरिंग प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार स्वरोजगार संस्थेतर्फे विनामुल्य टेलरिंग प्रशिक्षण
स्टार स्वरोजगार संस्थेतर्फे विनामुल्य टेलरिंग प्रशिक्षण

स्टार स्वरोजगार संस्थेतर्फे विनामुल्य टेलरिंग प्रशिक्षण

sakal_logo
By

विनामुल्य टेलरिंग
प्रशिक्षण आयोजन
रत्नागिरी ः बॅंक ऑफ इंडिया आणि स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत विनामुल्य टेलरिंग प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या अभ्यासक्रमात ब्लाऊजचे विविध प्रकार, पंजाबी ड्रेसेस, वनपीस फ्रॉक, गाऊन आदींसह उद्योजकता विकास महत्व आणि संवाद कौशल्य शिकवण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मोफत निवासी प्रशिक्षणाची सुविधा व साहित्य तसेच भोजन पुरवले जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असेल. उमेदवार हा रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी असला पहिजे, उमेद बचतगटातील सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असल्यास उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षण नाचणे रोड, शांतीनगर येथील वक्रतुंड अपार्टमेंटमधील इमारतीत होईल. प्रशिक्षण सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत असेल. नोंदणीसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व फोटो आवश्यक राहील.
------
चित्रकला हस्तकला
स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरीः जेएसडब्ल्यू फाउंडेशन रत्नागिरी आणि जिल्हा कलाध्यापक संघ यांच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा दोन गटात होणार आहेत. या दोन्ही स्पर्धेसाठी प्रवेश विनामुल्य आहे. चित्रकला स्पर्धेसाठी दिलेल्या विषयानुसार चित्र घरी रेखाटून शाळेत जमा करायचे आहे. हस्तकलेची वस्तूदेखील घरीच बनावयची आहे. जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती खुल्या गटात आपल्या वस्तू पाठवू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. चित्र व हस्तकलेची वस्तू जमा करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. शाळांनी लेटरहेडवर सहभागी विद्यार्थ्यांची यादी सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्वरूपकुमार केळसकर, सुशीलकुमार कुंभार, उदय मांडे यांच्याशी संपर्क साधावा.
......
दहावी-बारावी परीक्षेचे
वेळापत्रक निश्चित
रत्नागिरीः दहावी आणि बारावीतील वेळापत्रक परीक्षा बोर्डाने निश्चित केले असून या परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी दिली जाणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे दहावी-बारावीची परीक्षा गावोगावच्या शाळा, महाविद्यालयात झाली. आता कोरोनाचा धोका टळल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीच्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे. कोरोनामुळे प्रात्यक्षिक परीक्षादेखील पारदर्शकपणे होऊ शकली नाही. निर्बंधांमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती. आता संपूर्ण अभ्यासक्रमावर शंभर टक्के परीक्षा होईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. परीक्षेचे अर्ज भरून झाले असून आता परीक्षेची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. प्रश्नपत्रिका काढून त्याची छपाई करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकावेत या दृष्टीने कोरोनानंतरच्या या परीक्षेतून विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पडताळणी होईल. बारावीची परीक्षा २१ फेब्रवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे.