जास्त क्षमतेच्या नौकांनाही आता डिझेल कोटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जास्त क्षमतेच्या नौकांनाही आता डिझेल कोटा
जास्त क्षमतेच्या नौकांनाही आता डिझेल कोटा

जास्त क्षमतेच्या नौकांनाही आता डिझेल कोटा

sakal_logo
By

62488
देवगड ः येथील नैसर्गिक सुरक्षित बंदर. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


जास्त क्षमतेच्या नौकांनाही आता डिझेल कोटा

मच्छीमारांना दिलासा; विक्रीकर परतावा स्थगितीही उठवली, दीर्घकाळ होती मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः जिल्ह्यातील मच्छीमारी नौकांना खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी १२० अश्‍वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेचे इंजिन असलेल्या नौकांना आता राज्याने डिझेल कोटा मंजूर केल्याने मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने अलीकडे मार्चपासून डिझेल कोट्यासह डिझेल विक्रीकर परतावा स्थगित केल्यामुळे मच्छीमारांना खुल्या बाजारातून डिझेल खरेदी करून नौका चालविणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाले होते. याकडे मच्छीमारांचे विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून आपल्या मागणीचे निवेदन देत आंदोलनाचा इशाराही दिला होता; मात्र राज्याच्या नव्या अध्यादेशामुळे मच्छीमारांचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.
मच्छीमारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी येथील तहसीलदारांना निवेदन दिले होते. मच्छीमार संस्थेच्या डिझेल यंत्रचलित मासेमारी नौकेला राज्याकडून वार्षिक डिझेल कोटा एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षासाठी मंजूर होतो; परंतु प्रधान महालेखापाल यांच्या कार्यालयाने १२० अश्वशक्तीवरील इंजिन क्षमतेच्या नौकांसंदर्भात लेखापरीक्षण प्रश्न उपस्थित केल्याने मत्स्यव्यवसाय खात्याने १६ फेब्रुवारीच्या पत्राने प्रधान सचिव (पदुम) यांच्या आदेशाने १२० अश्वशक्तीवरील नौकांचा पुढील आर्थिक वर्षाचा डिझेल कोट्यात समावेश करू नये व डिझेल प्रतिपूर्ती रक्कमही अदा करू नये, असा आदेश दिला होता. केंद्राने पुरस्कृत केलेल्या (एनसीडीसी) नौकांना १८० अश्‍वशक्तीचे इंजिन बसविण्यासाठी परवानगी असल्याने इतर नौकांनी आपल्या इंजिनाची अश्वशक्ती ९९ अश्‍वशक्तीपासून वाढवून १८० पर्यंत केली. संबंधित नौका इतर नौकांप्रमाणे ३५ हजार ७०० लिटरचा डिझेल कोटा वापरून मासेमारीसाठी कार्यरत आहेत. त्यासाठी तो कोटा पुरेसा आहे. मग त्या नौका हायस्पीड प्रकारात दाखवून त्यांना सवलतीचे डिझेल आणि डिझेल विक्रीकर परतावा बंद केला गेला. मच्छीमारीसाठी नौकांना खोल समुद्रात जाण्यासाठी १२० अश्‍वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेची इंजिन आहेत. शासनाने मार्चपासून डिझेल कोटा व डिझेल विक्री कर परतावा स्थगित केल्यामुळे मच्छीमारांना खुल्या बाजारातून डिझेल खरेदी करून नौका चालविणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे होते. याबाबत राज्याचे तत्कालीन मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची मच्छीमारांनी वारंवार भेट घेतली होती. राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतरही आताचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू होता. त्यांनी त्याला तत्कालीन मंजुरी देऊन संबंधित प्रस्ताव अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडे पुढील प्रक्रियेत होता. दरम्यानच्या काळात या समस्यांनी मच्छीमार ग्रासले होते. याप्रकरणी येथील तीनही मच्छीमार संस्थांच्या नौका मालकांसह सहकारी संस्थांचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे मच्छीमारांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत वेळीच ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नौका मालकांनी दिला होता; मात्र आता डिझेल कोटा मंजूर झाल्याने मच्छीमांराची समस्या दूर झाली आहे.
.................
चौकट
मच्छिमारांचे उपोषण मागे
१२० अश्वशक्तीवरील नौकांचा मार्च २०२२ पासून बंद असलेला डिझेल कोटा मंजूर करुन मच्छीमारांचा प्रश्न सुटल्याने दिनांक २२ ला समुद्रात होणारे आमरण उपोषण मागे घेतल्याची घोषणा तिन्ही मच्छीमार संस्थांच्या आज झालेल्या संयुक्त सभेमध्ये करण्यात आली. मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडे १२० अश्वशक्तीवरील नौकांचा जमा असलेला डिझेल विक्रीकर परतावा नौका मालकांना तात्काळ वितरीत करण्याचे आदेश काढण्यात यावेत व डिझेल कोटा लवकरात लवकर मंजूर करुन वितरण करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू, देवगड फिशरमेन्स को-ऑप सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष उमेश आंबेरकर, देवदुर्ग मच्छीमार संस्थेचे सचिव कृष्णा परब, जगन्नाथ कोयंडे तसेच मच्छीमार नौकामालक उपस्थित होते.
--
असा झाला निर्णय
१४ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार शासनमान्य डिझेल कंपनीला मत्स्यव्यवसाय आयुक्त डिझेल वाटपाबाबत प्राधिकृत करतील. निकषानुसार १ ते ६ सिलेंडर नौकांना लागणार्‍या अनुज्ञेय डिझेल कोट्याच्या मर्यादेच्या अधीन राहून ६ सिलेंडरच्या १२० अश्‍वशक्ती व त्यावरील अश्‍वशक्तीच्या मासेमारी नौकांना १ जून ते ३१ जुलै हा मासेमारी बंदी कालावधी वगळून मत्स्यव्यवसाय आयुक्तांमार्फत डिझेल कोटा ठरविण्यात येईल.
...................
सिंधुदुर्गात ४७ नौकांचा समावेश
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात १२० अश्‍वशक्तीपेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेल्या ४७ मच्छीमारी नौका आहेत. त्यामध्ये एकट्या देवगड तालुक्यातील ४१ व मालवण तालुक्यातील ६ नौकांचा समावेश आहे.
----
कोट
62489
ट्रॉलिंग मासेमारी पद्धतीत जाळे ओढत नौका चालत असते. अशावेळी जास्त वेगात नौका भार घेऊन चालण्यासाठी जास्त क्षमतेच्या इंजिनची आवश्यकता भासते. तरच मासे मिळतात. म्हणून मच्छीमार जास्त क्षमता असलेले इंजिन वापरतात. सध्या मिळणारे मासे, इंधनाचा दर, खर्चाचे वाढते प्रमाण पाहता राज्याने १२० अश्‍वशक्तीपेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेल्या नौकांना तातडीने डिझेल कोटा मंजूर करणे आवश्यक होते; मात्र आता हा प्रश्‍न निकाली निघाला.
- अरुण तोरस्कर, व्यवस्थापक, तारामुंबरी सहकारी मत्स्य व्यावसायिक संस्था, देवगड