बालमैफलीतील कलाकार ठरले उस्ताद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालमैफलीतील कलाकार ठरले उस्ताद
बालमैफलीतील कलाकार ठरले उस्ताद

बालमैफलीतील कलाकार ठरले उस्ताद

sakal_logo
By

rat१५p३२jpg -
६२५१९
रत्नागिरीः बालदिनानिमित्त आयोजित ‘सूर निरागस’ मैफल रंगवताना बालकलाकार.

बालमैफलीतील कलाकार ठरले उस्ताद
सूर, तालावर पक्की पकड; १८ गायक, वादक, तंत्रज्ञही
रत्नागिरी, ता. १५ ः आलाप, तानांची कसरत लिलया पेलत, बालवयातही तालावरची पकड सिद्ध करत बालकलाकारांनी आपल्या निरागस सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ''स्वराभिषेक-रत्नागिरी'' आयोजित बालदिन विशेष मासिक संगीत मैफल. या मैफलीच्या यशात महत्वपूर्ण ठरलेल्या गायन, वादन, तंत्रज्ञ आणि व्यवस्थापन या सर्वच विभागांची छोट्या कलाकारांनी समर्थपणे पेललेली जबाबदारी त्यामुळे केलेली उत्तम कामगिरी रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली.
शास्त्रीय गायन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगमंचीय सादरीकरणाचा धडा मिळावा, कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन समजावे याकरिता ‘स्वराभिषेक’तर्फे दर महिन्याला संगीत मैफल आयोजित केली जाते. काल (ता. १४) बालदिनाचे औचित्य साधून या महिन्याची मैफल आगळीवेगळी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये स्वराभिषेक संगीतवर्गासह तबला, पखवाज, हार्मोनियमचे शास्त्रीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना साथीला घेऊन सर्वार्थाने बालकलाकारांनी ही मैफल सादर केली. गोवा येथील छोटा कलाकार ऋषिकेश ढवळीकर हा पाहुणा कलाकारही यामध्ये सहभागी झाला होता. त्याने सरस्वती रागातील बडा ख्यालाने मैफलीला प्रारंभ केला. त्यानंतर स्वरा भागवत हिने राग भीमपलास तर वेदिका गांधी हिने राग भूप सादर केला. आदित्य दामले आणि ऋग्वेदा हळबे यांनी दोन अभंग दमदार आवाजात म्हटले. शेवटी ऋषिकेश ढवळीकर याने सुरतपिया की हे नाट्यपद व भैरवी गाऊन मैफलीची सांगता केली.
या साऱ्या बालकलाकारांची सुरावरची पकड वाखाणण्याजोगी होती. गायकांना तितक्याच समर्थपणे श्रीरंग जोगळेकर, आदित्य पंडित, ओजस करकरे, ऊर्जा आपटे आणि स्वरा भागवत यांनी संवादिनीची तर स्वरूप नेने, सारंग जोशी यांनी तबलासाथ, यश बने आणि सुबोध लिंगायत यांनी पखवाजसाथ, अद्वैत मोरेने तालवाद्याची तर मीरा सोवनी हिने तानपुरासाथ केली. स्वरा लाकडे आणि ईशा रहाटे यांचे नेटके निवेदन रसिक आणि गायकामधील दुवा ठरले. राधिका बेर्डे हिने ध्वनिसंयोजनही उत्तम केले. विनया परब यांनी संगीत संयोजन केले होते.
मैफलीदरम्यान या साऱ्या कलाकारांना घडवणाऱ्या गुरूंचा सन्मान स्वराभिषेकतर्फे करण्यात आला. टीम स्वराभिषेक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या साऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. त्यासाठी गगनगिरी महाराज आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले आणि सहकारी तसेच चैतन्य पटवर्धन यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

कोट
‘स्वराभिषेक’ची ही मैफल म्हणजे एक सांगीतिक मेजवानी ठरली. बालकलाकारांच्या निरागस सुरांनी बालदिनाला आगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मैफलीनंतर दीर्घकाळ बालकांचे सूर कानात गुंजत होते. एखाद्या अनुभवी कलाकारांप्रमाणे प्रत्येकाचा रंगमंचावरील वावर वाखाणण्याजोगा होता.
- दीप्ती आनंद पंडित