67 ग्रामपंचायतीना वर्षभर राऊटर मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

67 ग्रामपंचायतीना वर्षभर राऊटर मिळेना
67 ग्रामपंचायतीना वर्षभर राऊटर मिळेना

67 ग्रामपंचायतीना वर्षभर राऊटर मिळेना

sakal_logo
By

( पान ५ साठी)

६७ ग्रामपंचायतीना वर्षभर राऊटर मिळेना

राजापूर तालुका ; इंटरनेट अ‍ॅक्टिव्ह होण्याची प्रतीक्षा


सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः पंचायत राजव्यवस्थेतील शेवटचा टप्पा असलेल्या गावविकासाला चालना देणाऱ्या ग्रामपंचायतींचा कारभार डिजिटल (ऑनलाइन) करण्यावर शासनाकडून भर दिला गेला आहे. त्यातून, महानेट प्रकल्पाच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबरद्वारे ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उभारणी केली जात आहे. त्यानुसार तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींपैकी ६७ ग्रामपंचायतींमध्ये फायबर ऑप्टिकल जोडणीचे काम पूर्ण झाले आहे; मात्र, या ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर जोडणी होऊनही राऊटरअभावी गेल्या सुमारे वर्षभरापासून इंटरनेट सुविधा अ‍ॅक्टिव्ह होण्याची प्रतीक्षा आहे.
पंचायत राजव्यवस्थेमध्ये शेवटचा टप्पा असलेल्या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी येतो. त्यामुळे ग्रामपंचायतींना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात थेट उपलब्ध होणाऱ्‍या निधीमुळे या ठिकाणी विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यताही नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे कारभार पारदर्शक व्हावा, त्याची माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल करण्यावर शासनाकडून भर देण्यात आला आहे. त्यातून अनेक ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन झाला आहे. ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून आलेला निधी, विकास आराखडे, खर्च झालेला निधी यांसह ग्रामपंचायतीसंबंधित अन्य माहिती सर्वसामान्यांना मिळते. मात्र, अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्याने इंटरनेटच्या साहाय्याने ऑनलाइन कारभार करताना ग्रामपंचायतींना अडथळे येतात. त्यावर मात करण्याच्या उद्देशाने इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे महानेट प्रकल्प राबवला जात आहे.
यामध्ये शासनातर्फे ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे गावामध्ये मोबाईल रेंज असो वा नसो ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सुविधा सुरू राहणार आहे. महानेटच्या ऑप्टिकल फायबर टाकण्याचे तालुक्यामध्ये गेल्या सुमारे दीड वर्षापासून काम सुरू आहे. त्यातून, १०१ पैकी ६७ ग्रामपंचायतींची ऑप्टिकल फायबर जोडणी झाली आहे. मात्र, त्या ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही राऊटर जोडणी झालेली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ऑप्टिकल फायबर जोडणी होऊनही राऊटरअभावी संबंधित ग्रामपंचायतींना सुमारे वर्षभरापासून इंटरनेट सुविधा उपलब्धतेची प्रतीक्षा राहिलेली आहे.

दृष्टिक्षेपात राजापूर

एकूण ग्रामपंचायती ः १०१
फायबर जोडणी झालेल्या ग्रामपंचायती ः ६७
--------------