कर्ला ग्रामपंचायतीविरोधात दणदणीत मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्ला ग्रामपंचायतीविरोधात दणदणीत मोर्चा
कर्ला ग्रामपंचायतीविरोधात दणदणीत मोर्चा

कर्ला ग्रामपंचायतीविरोधात दणदणीत मोर्चा

sakal_logo
By

(पान ५ साठी )

rat१५p२८.jpg-
६२५११
रत्नागिरी ः विविध मागण्यांसाठी कर्ला ग्रामपंचायतीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढला.


कर्ला ग्रामपंचायतीविरोधात दणदणीत मोर्चा

सुविधांकडे दुर्लक्ष ;खुर्च्या खाली करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः मुलभूत आणि पायाभूत सुविधा पुरवण्याकडे कार्ला ग्रामपंचायतीचे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचा आक्षेप घेत कर्ला ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढला. खड्डेमुक्त व सुंदर रस्ते झालेच पाहिजे, स्वच्छ, शुद्ध व मुबलक पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणांनी शेकडो ग्रामस्थांनी कर्ला परिसर दणाणून सोडला.
निसार मुल्ला यांच्यासह अन्य काही लोकांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सकाळी साडेअकरा वाजता कर्ला गावातून निघाला. या मोर्चाला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत त्यांच्या मनात खदखद होती. विद्यमान सत्ताधाऱ्यांवर ग्रामस्थांचा पायाभूत सुविधा नाहीत हा रोष होता. सुंदर रस्ते झालेच पाहिजे, शुद्ध व मुबलक पाणी मिळालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा देत हा मोर्चा ग्रामपंचायतीवर निघाला. शिस्तीत हा मोर्चा ग्रामपंचायतीपर्यंत गेला आणि ग्रामपंचायतीच्या इमारतीपुढेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली परखड मते मांडली. यामध्ये निसार मुल्ला म्हणाले, तीन वर्षांमध्ये कर्ल्यातील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. ग्रामपंचायतीने कचरा निर्मुलनाची कोणतीच व्यवस्था केलेली नाही. बंदारवर ग्रामस्थ कचरा टाकतात. गाव कचऱ्याच्या विळख्यात आले आहे. त्यामुळे मलेरिया, चिकनगुनियासारख्या साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो. रस्ता देणे, कचरामुक्त गाव करणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे; परंतु सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप मोर्चेकऱ्यानी केला.
सार्वजनिक गटारांचीही तिच परिस्थिती आहे. सार्वजनिक शौचालयाची एवढी दुर्दशा झाली आहे की, जिवंत माणूस शौच करायला जाऊ शकत नाही. गावच्या या परिस्थितीला विद्यमान सत्ताधारी आणि सरपंचच जबाबदार आहेत. ग्रामपंचायत गावाला अशुद्ध पाणीपुरवठा करू शकत नाही. पाण्याचे नमुने तपासले असता ते पिण्यास योग्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली दीड वर्षे आम्ही सत्ताधाऱ्यांशी पत्रव्यवहार करत आहोत. त्यांना निवेदन दिले आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. जनतेचे कोणतेही मत ऐकून न घेता मनमानी कारभार सुरू आहे. म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आता त्यांनी कारभार सुधारला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

सरपंच म्हणतात लोकच घाण करतात

याबाबत सरपंच जबीन मकबूल अख्तर शिरगावकर म्हणाल्या, आम्हाला मुख्य रस्त्यासाठी १० लाख मंजूर झाले मात्र तोवर पाऊस आल्याने काम लांबले. लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल. सार्वजनिक शौचालये चांगली आहेत. आमचे कर्मचारी आठवड्यातून २ वेळा त्याची साफसफाई करतात; परंतु लोकच त्यामध्ये घाण करतात. आमचे स्वच्छतेचे काम सुरूच राहिल. गावात कचऱ्यासाठी जिल्हा परिषदेकडे डंपिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी केली होती; परंतु अजून जागा मिळालेली नाही. मग आम्ही जिथे जागा मिळेत तिथे कचरा टाकतो. गावाला शुद्ध पाणी पुरवले जाते. आम्ही तपासणी केली ते पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आरोप करण्याचा संबंधच येत नाही. आतापर्यंत त्यांनी फक्त एकदाच आमच्याकडे समस्यांसंदर्भात पत्रव्यवहार केला. त्याला आम्ही लगेच उत्तर दिले.