नगर पालिका मुख्याधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगर पालिका मुख्याधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत
नगर पालिका मुख्याधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत

नगर पालिका मुख्याधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

( पान ३ )

खेडला नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत

पुन्हा प्रभारींचा सिलसिला , एका अधिकाऱ्यांकडे दोन पालिकांचा कारभार

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १५ ः खेड नगर पालिकेला प्रमोद ढोरजकर यांच्या रूपाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी लाभलेले असतानाच अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची श्रीगोंदा येथे अचानक बदली झाली. सद्यःस्थितीत मंडणगडचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याकडे येथील नगर पालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्यांवर दोन नगर पालिकांचा कारभार, अन प्रभारींचा सिलसिला पुन्हा सुरू होण्याची लक्षणे आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून नगर पालिकेचा कारभार प्रभारींकडेच असून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्‍यांच्या प्रतीक्षेत खेड नगर पालिका आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्‍यांच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ शहरवासीयांवर ओढवली आहे. येथील मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची गतवर्षी ऑगस्ट महिन्यात चिपळूण येथे बदली झाल्यानंतर येथील कार्यभार दापोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांचीही अन्यत्र बदली झाल्यानंतर रिक्त जागी बालाजी लोंढे यांच्या नियुक्तीचे आदेश पारित झाले होते. मात्र, त्यांनी येथील कार्यभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर येथील नगर पालिकेचा कार्यभार दापोलीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. दोन नगर पालिकांचा कार्यभार सांभाळताना त्यांना कसरतीला सामोरे जावे लागत होते. येथील नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकाऱ्‍यांचा सिलसिला सुरू असतानाच प्रमोद ढोरजकर यांची येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली. वर्षभराच्या कालावधीनंतर कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने विकासकामांना चालना मिळाली होती. प्रलंबित विकासकामे मार्गी लागत होती. याशिवाय माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला होता; मात्र अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची अन्यत्र बदली झाल्याने पुन्हा नगर पालिकेत प्रभारींचा सिलसिला सुरू झाला आहे.