खेड ः लोटेतील रासायनिक कारखान्यांचे सर्व प्रकारचे ऑडिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः लोटेतील रासायनिक कारखान्यांचे सर्व प्रकारचे ऑडिट
खेड ः लोटेतील रासायनिक कारखान्यांचे सर्व प्रकारचे ऑडिट

खेड ः लोटेतील रासायनिक कारखान्यांचे सर्व प्रकारचे ऑडिट

sakal_logo
By

62580


लोटेतील रासायनिक कारखान्यांचे ऑडिट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दुर्घटनांबाबत स्वतः लक्ष घालणार
खेड, ता. १५ ः कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे आणि रायगडमधील महाड एमआयडीसीमध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनांबाबत स्वतः लक्ष घालणार असून, लोटे आणि महाड एमआयडीसीमधील सर्व रासायनिक कारखान्यांचे सर्व प्रकारचे ऑडिट, सर्व्हे लवकरच होणार आहेत. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते खेडमधील तळे गावात पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सासरे-आजोबा विठू नाना कदम यांच्या कुटुंबात खासगी भेटीसाठी खेडमधील तळेगावात आज मुख्यमंत्री शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे एमआयडीसी आणि रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये सतत दुर्घटना होत आहेत. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानीदेखील होत आहे. स्फोटांमुळे आणि वायूगळतीमुळे मोठे नुकसान होत असून या सतत होणाऱ्या दुर्घटनांबाबत आपण स्वतः लक्ष घालणार असून, या दोन्ही एमआयडीसीमधील सर्व रासायनिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे ऑडिट आणि सर्व्हे केला जाणार आहे. शासनाच्या नियम आणि अटींचे या कंपन्या पालन करतात की नाही याबाबत तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे काही करायला हवं त्याबाबत आपण उद्योगमंत्र्यांशी बोललो असून लवकरच या सर्व्हेला सुरुवात होईल.’
या वेळी बाळासाहेबांची शिवसेना नेते रामदास कदम, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णा कदम, संजय मोदी यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यटन, उद्योगवाढीसाठी प्रयत्न
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर आपण स्वतः लक्ष ठेवून राहणार आहोत. कोकणातील पर्यटन आणि तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कोस्टल हायवेदेखील रूंदीकरण करून कोकणात पर्यटकाला चालना मिळेल, तरुणांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. कोकणात तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर नवनवीन उद्योग जिल्ह्यात कोकणात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. लवकरच या संदर्भात प्रयत्न सुरू होतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री म्हणाले...
‘रिफायनरी’बाबत सरकार जनतेसोबत
कोकणात सिंचनाचे प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न
कोयनेचे समुद्रात जाणारे पाणी सिंचन वापरासाठी चाचपणी
रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण
‘समृद्धी’च्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घेणार