अवघ्या दहा मिनिटांत उभे राहिले ‘फिरते घर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या दहा मिनिटांत उभे राहिले ‘फिरते घर’
अवघ्या दहा मिनिटांत उभे राहिले ‘फिरते घर’

अवघ्या दहा मिनिटांत उभे राहिले ‘फिरते घर’

sakal_logo
By

६२६०७

अवघ्या दहा मिनिटांत उभे राहिले ‘फिरते घर’

कष्टकऱ्यांचा आसरा; पोटाच्या खळगीसाठी विजापूरचे कुटुंब पुन्हा जिल्ह्यात

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ ः पावसाळा सुरू झाला की गावाकडे जायचे आणि पावसाळा संपला की पुन्हा पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात सिंधुदुर्गात यायचे, विजापूर येथील खेरू राठोड हे पत्नी आणि आपल्या लहान चिमुकलीसह पुन्हा वैभववाडीत दाखल झाले. त्यांनी मिळालेले काम सुरू केले. क्षणभर विश्रांतीसाठी आणि चिमुकल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने अवघ्या दहा मिनिटांत तीन काठ्या, एक कापड आणि भातांचा पेंडा वापरून अवघ्या दहा मिनिटांत फिरते घर उभे केले.
कर्नाटक, विजापूर भागातील हजारो कामगार पावसाळा संपला की मोलमजुरीच्या कामासाठी सिंधुदुर्गात येतात. पावसाळा सुरू होईपर्यंत येथे काम करायचे, काही पुंजी जमा करायची आणि पावसाळा सुरू होताच घर गाठायचे. जमविलेल्या पुंजीतून कसाबसा पावसाळा घालवायचा आणि पुन्हा रोजीरोटीसाठी जिल्ह्यात यायचे हे एक आता समीकरण बनले आहे. अनेक मजूर जिल्ह्यात येतात. त्यापैकी काही मुकादमाच्या माध्यमातून येतात तर काही थेट देखील येतात. क्रशर, खडीकरण, डांबरीकरण, विहिरी खोदणे तर कुणी चर खोदण्याचे काम करतात. राठोड कुटुंबीय हे या कष्टकऱ्यांचे एक प्रातिनिधीक उदाहरण.
---
चिमुकल्यांची काळजी
दोन दिवसांपूर्वी विजापूर येथील खेरू राठोड हे देखील दरवर्षीप्रमाणे वैभववाडीत आले. त्यांना शहरात खासगी जलवाहिनी घालण्यासाठी चर खोदण्याचे काम मिळाले. दोन दिवसांपासून हे कुटुंब काम करीत आहे. त्यांच्यासोबत दोन-तीन वर्षांची चिमकुलीही आहे. काम करताना त्यांना विश्रांतीसाठी निवारा हवा होता. चिमुकल्यालाही जेवण भरावायचे होते. दमलेल्या, थकलेल्या या कुटुंबाने सावलीचा शोध न घेता कामाच्या ठिकाणीच तीन बाबूंच्या काठ्या ठोकल्या, त्यावर तयार असलेले कापड घातले आणि ते वाऱ्याने उडुन जाऊ नये म्हणून तिथेच असलेल्या भातांचा पेंडा घातला. आणि अवघ्या दहा मिनिटांत फिरते घरच उभे केले.
---
आनंदाचे चार घास
घर तयार केल्यानंतर तयार करून आणलेल्या भाकरीचे गाठोड सोडले. खेरू आणि त्यांची पत्नी स्वतःसोबत आपल्या चिमुकलीला देखील भरवित होती. सध्या प्रत्येकजण इमल्यावर इमले चढविण्याची स्वप्ने पाहत आहे. एकमेकांच्या अनुकरणातून मोठ मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत; परंतु या कुटुंबाने दहा मिनिटांत उभारलेल्या त्या इवल्याशा, फिरत्या घरांची चर्चा विविध अर्थाने सुरू होती.