हळवल फाटा ‘मृत्यूचा सापळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळवल फाटा ‘मृत्यूचा सापळा’
हळवल फाटा ‘मृत्यूचा सापळा’

हळवल फाटा ‘मृत्यूचा सापळा’

sakal_logo
By

62738
कणकवली : शहरालगतचे हळवल फाट्यावरील अपघातप्रवण क्षेत्र.

हळवल फाटा ‘मृत्यूचा सापळा’

दीड वर्षांत सात अपघात, पाच बळी; नव्या महामार्गावरील कणकवलीनजीकचे ठिकाण

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ ः शहरातील उड्डाणपूल संपल्यानंतरचा तीव्र उतार आणि त्यानंतर लगेच येणारे वळण यांचा अंदाज येत नसल्याने या वळणावर वारंवार अपघात होत आहेत. गेल्या दीड वर्षांत तब्बल सात वेळा अपघात झाले असून पाच जणांना प्राण गमवावा लागला आहे. वाहन चालकांसाठी हळवल येथील वळण जीवघेणे ठरत असून देखील अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसते.
महामार्ग चौपदरीकरणाचा आराखडा तयार करताना नद्यांवरील पुलांच्या जागा तशाच ठेवण्यात आल्या. त्यामुळे पुलांच्या लगत असलेला रस्ताही वळणावळणाचा राहिला आहे. यात कणकवली शहरातील गड नदीवरील पूल संपल्यानंतर लगेच असणारे ९० अंशातील वळण कायम राहिले आहे. महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने शहरातील उड्डाणपूल संपल्यानंतरही त्याच वेगाने पुढे जातात. यात, गड नदीवरील पूल ओलांडल्यानंतरचे तीव्र वळण अवजड वाहनांसाठी डोकेदुखी ठरले आहे. छोटी वाहने सहज जातात; मात्र अवजड वाहनचालकांना या वळणावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळे भरधाव वाहने या वळणावर जाऊन कोसळतात. त्यानंतर होणाऱ्या अपघातामध्ये प्रामुख्याने वाहनचालक आणि क्लिनर यांचे बळी जात आहेत. गेल्या दीड वर्षांत हळवल येथील वळणावर अवजड वाहनांचे सात अपघात झाले असून पाच जणांना जीव गमवावा लागला.
---
ग्राहकांचाही जीव धोक्यात
हळवल येथील वळण रस्त्याकडेला स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत. तसेच भाजी आणि मासळी विक्रेतेही याच वळणावर बसून व्यवसाय करतात. यापूर्वी दोन वेळा झालेल्या अपघातांत अवजड वाहने येथील स्टॉलमध्ये देखील घुसली होती. सुदैवाने रात्री आणि दुपारच्या वेळेत हे अपघात झाले. त्यावेळी स्टॉल बंद असल्याने जीवितहानी टळली; मात्र येथे वारंवार अपघातांची शक्यता निर्माण होत असल्याने येथील स्टॉलधारक आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---
उपाययोजनाच नाहीत!
हळवल वळणावर होणारे अपघात टाळण्यासाठी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून वळण कमी करणे, तसेच ९० अंशातील वळण कमी करण्यासाठी या भागात पर्यायी रस्ता काढणे आदी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिकांनी महामार्ग विभागाकडे केली; परंतु गेल्या वर्षभरात अपघात टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना झालेल्या नसल्याने कणकवली शहरालगतचे ‘ते’ धोकादायक वळण मृत्यूचा सापळा बनले आहे.
.............
कोट
हळवल येथील धोकादायक वळणावर होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना व्हावी. तसेच येथे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी स्टॉल हटविण्यात यावेत, यासाठी आम्ही प्रांताधिकारी, महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत; मात्र वारंवार अपघात होऊन देखील प्रशासनाने याकडे डोळेझाक केली असून आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही.
- सुदर्शन राणे, ग्रामपंचायत सदस्य, हळवल