Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषणाला ‘ब्रेक’ लागेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malnutrition
जिल्ह्यात कुपोषणाला ‘ब्रेक’ लागेना

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषणाला ‘ब्रेक’ लागेना

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद प्रशासनाच्या गेल्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही जिल्ह्यात कुपोषणाला ब्रेक लागलेला नाही. कुपोषणाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०२४ बालके कमी वजनाची (कुपोषित) असल्याची माहिती अहवालावरून समोर आली आहे. कुपोषणामागचे कारण शोधण्याची व प्रभावी उपाय योजनेची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील ३४ हजार ४६० एवढी बालके आहेत. या बालकांपैकी ऑक्टोबर अखेर ३४ हजार ४३३ बालकांचे वजन घेतले असता जिल्ह्यात एकूण ३३ हजार ४०९ बालके सर्वसाधारण वजनाची आहेत. तर कमी वजनाची ९४० व तीव्र कमी वजन असलेली ८४ बालके असल्याचा अहवाल जिल्हा महिला बाल कल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील (कुपोषित) कमी वजन असलेल्या बलकांची संख्या प्रशासनाला गांभीर्याने विचार करायला लावणारी अशी आहे.

जिल्ह्यात १५९४ एवढी अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून या केंद्रांमार्फत या मुलांना शासनाचा सकस आहार पुरविला जातो. त्यांची विशेष काळजी घेतली जाते. या ठिकाणी नोदित (सर्वेक्षित) असलेल्या जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील ३५ हजार ७४१ बालकांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील ५ हजार ८९७, कणकवली हजार ८९८, मालवण ३ हजार ४५२, वेंगुर्ले ३ हजार ०१६, कुडाळ ७ हजार ३४७, वैभववाडी १ हजार ६२५, देवगड ४ हजार ८३४, तर दोडामार्ग तालुक्यातील २ हजार ३९१ बालकांचा समावेश आहे. या सर्वेक्षित बालकांपैकी ३४ हजार ४३३ बालकांचे ऑक्टोबर अखेर वजन घेण्यात आले. त्यामध्ये ९४० बालके कमी वजनाची (मॅम) आहेत. कमी वजन असणार्‍या बालकांमध्ये सर्वाधिक कुडाळ तालुक्यात २६१ बालके, सावंतवाडी १६०, कणकवली १३७, देवगड ११२, वेंगुर्ले ९१, मालवण ८८, दोडामार्ग ५९, तर वैभववाडी तालुक्यातील ३२ बालकांचा समावेश आहे. यापैकी १०९ बालकांमध्ये सुधारणा होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

उपाय आहेत, पण...

जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील कमी वजनाच्या कुपोषित मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. त्यांच्या वजनामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी विशेष आरोग्य तपासणीसह पौष्टिक आहार दिला जातो. पालकांचे समुपदेशन करून त्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. गरोदर मातांची नियमित तपासणी, आवश्यक उपचार आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. तरीही जिल्ह्यातील कुपोषणाचे संकट कायम आहे.

विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम

मुले कुपोषित जन्माला येण्याची अनेक कारणे आहेत. कमी वयात मुलांना जन्म देणे, मुलांमध्ये अंतर न राखणे ही कारणे असली तरी विभक्त कुटुंब पद्धती हे एक प्रमुख कारण आहे. सध्याच्या काळात विभक्त कुटुंबाला पसंती दिली जाते. त्यामुळे पती-पत्नी कामानिमित्त बाहेर असताना मुलांच्या आरोग्याकडे व जेवणाकडे दुर्लक्ष होतो. घरी शिजवलेले पौष्टिक अन्न देणे शक्य होत नाही. परिणामी बाहेरून खरेदी केलेले खाद्यपदार्थ मुलांना दिले जातात. विभक्त कुटुंब पद्धतीत नोकरी सांभाळून मुलांना सांभाळणे, जेवण करणे, त्यांची काळजी घेणे ही महिलेची कसरत असते. अशावेळी मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होतो. मुलांना शिळे जेवण किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ सर्रास दिले जातात. हे एक कुपोषणाचे प्रमुख कारण ठरू शकते.

सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा, जिल्ह्यात सुदृढ बालके जन्माला यावीत, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून विविध उपक्रम व शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. गरोदर मातांचे समुपदेशन करण्यात येत आहे. मुले सुदृढ जन्माला यावीत, जन्मानंतर त्यांचे वजन योग्य राहावे, यासाठी मुलांचे योग्य संगोपन करणे व काळजी घेणे, ही जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून ती संबंधित पालकांचीही आहे.

- डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यात कमी वजनाची बालके जन्माला येण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये कमी वयात मुलींची लग्ने, मुलांमध्ये जन्माचे योग्य अंतर न ठेवणे, संगोपनाबाबत निष्काळजी आणि गरीबी ही प्रमुख कारणे आहेत. यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. कुपोषित मुलांना दत्तक घेण्याची योजना राबविण्यात येत आहे.

- संतोष भोसले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी