पावस-अरुंद गोळप मोहल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-अरुंद गोळप मोहल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात
पावस-अरुंद गोळप मोहल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात

पावस-अरुंद गोळप मोहल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात

sakal_logo
By

rat16p23.jpg

पावसः गोळप मोहल्ला परिसरात रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत असून रस्त्यालगत बोअरवेल पाडण्यात आली आहे.
-----------------

अरुंद गोळप मोहल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात
कारवाईकडे दुर्लक्ष ; विद्यार्थ्यांसह व्यापाऱ्यांनाही फटका, ग्रामपंचायतीला निवेदन
पावस, ता. १६ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप मोहल्ला परिसरात अरुंद रस्ता, रस्त्यावर होणाऱ्या खासगी बांधकामांचे अतिक्रमण, वारंवार पाइपलाइनच्या नावाखाली खोदला जाणारा रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यालगत खोदलेली विंधन विहीर, उभी असलेली वाहने, त्यानंतर झालेली त्याची दयनीय अवस्था यामुळे एसटी सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी आणि गैरसोय टाळावी, अशी मागणी पावस ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी गोळफ ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोळप मुस्लिम मोहल्ला परिसरात अरुंद रस्त्यामुळे गोळप पूल ते पावस बसस्थानक असा पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या परिसरामध्ये एसटी वाहतूक सुरू होती; परंतु अरुंद रस्त्याजवळ सातत्याने बांधकामे करताना रस्त्याचा विचार न करता अनधिकृतपणे बांधकामे केली जात आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहने उभी करून ठेवत असल्यामुळे एसटी वाहनचालकांना वाहने चालविताना अडथळा येतो. त्यामुळे अखेर एसटी महामंडळाने पावस बाजारपेठमार्गे एसटी सेवा बंद केली.
गोळप ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे व त्यांच्या आदेशाचे पालन करत नसल्याने दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले आहे. सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटारकाम करण्यात आले; परंतु काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यातच एकाने रस्त्यालगत विंधन विहीर (बोअरवेल) पाडल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थी, खासगी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बाजारपेठेमध्ये येणे कठीण बनले आहे. त्याचा परिणाम सर्व व्यवसायावर होत आहे. या संदर्भात गोळप ग्रामपंचायतीला या संदर्भात निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या मोहल्ला परिसरात जिओ या मोबाईल कंपनीचे खोदाईचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण बनले आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष सुर्वे यांच्याशी संपर्क केला असता गोळप ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे रस्त्यावर अतिक्रमणे होत आहेत. या संदर्भात पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आदी ठिकाणी निवेदन देण्यात आली आहेत. या निवेदनावर रऊफ हवालदार, स्वप्नील भास्कर, सूर्यकांत नाटेकर, गोविंद सुर्वे आदी २४ जणांच्या सह्या आहेत.