रत्नागिरी ः रत्नागिरीत डंम्पिग ग्राऊंडवर आग लावली जाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नागिरीत डंम्पिग ग्राऊंडवर आग लावली जाते
रत्नागिरी ः रत्नागिरीत डंम्पिग ग्राऊंडवर आग लावली जाते

रत्नागिरी ः रत्नागिरीत डंम्पिग ग्राऊंडवर आग लावली जाते

sakal_logo
By

६२७७४

डंम्पिग ग्राऊंडला जाणीवपूर्वक आग
रत्नागिरीत धुरावर निघणार उपाय; कचऱ्यावरील प्रक्रिया बंदच
रत्नागिरी, ता. १६ ः शहरातील साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याला वारंवार आग लावली जात असल्याने या परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरून प्रचंड प्रदूषण होते. याबाबत शहरातील शिष्टमंडळाने पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन डंपिंग ग्राऊंडला भेट दिली. तेव्हा आग लागत नाही तर लावली जाते, असे प्रथमदर्शनी दिसून आले. या प्रश्नावर कायमचा तोडगा दूर असला तरी त्यातून निघणाऱ्या धुरावर उपाययोजना करण्याचे आश्वासन पालिकेने दिले असून डंपिंग ग्राउंड येथे कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब दिला जाणार आहे.
माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे, पुजा पवार, काव्या कामतेकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन बुधवारी पालिका प्रशासकांना भेटून वरील आश्वासन मिळवले. तेथे आग लावणारा सापडल्यास त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी पालिकेकडे केली आहे. साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने दिवसेंदिवस या डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याचे साम्राज्य वाढतच चालले आहे. शहरात दरदिवशी सुमारे २० ते २२ टन कचरा निघतो. त्याचे विघटन करून तो या डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथे खतनिर्मिती केली जात होती; परंतु ही प्रक्रियादेखील बंद पडली आहे. डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याला वारंवार आग लागते. कचरा साठून राहिल्याने तेथे मिथेनॉल वायू तयार होऊन प्रखर उन्हात कचऱ्याला आग लागते, असे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते; मात्र त्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. या सर्व प्रकारामुळे परिसरात धुराचे साम्रज्य पसरते. या प्रदूषणकारी धुरामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. वयोवृद्ध आणि बालकांना खोकला, दम्यासारखे आजार होऊ लागले आहेत.
डंम्पिग ग्राऊंडवरील आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब देण्यात येणार आहे. यामुळे धूर आणि प्रदूषण रोखणे शक्य होणार आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी याबाबत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


साळवी स्टॉप हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणीच डंपिंग ग्राऊंड असल्याने कचऱ्याला आग लागल्यास प्रचंड धूर होतो. हा धूर एवढा हानीकारक आहे की तेथील लोकांना श्वसनाचा त्रास होतो. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. स्वच्छ सुंदर रत्नागिरीचे नाव यामुळे खराब होत आहे.
- सौरभ मलुष्टे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, रत्नागिरी