संगमेश्वर-पाटण घाटमार्ग ः एक मृगजळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-पाटण घाटमार्ग ः एक मृगजळ
संगमेश्वर-पाटण घाटमार्ग ः एक मृगजळ

संगमेश्वर-पाटण घाटमार्ग ः एक मृगजळ

sakal_logo
By

( टुडे पान 2 साठी, लेख)


इंट्रो
संगमेश्वर तालुक्याला सातारा जिल्ह्याशी थेट जोडणारा रस्ता म्हणून संगमेश्वर-पाटण घाटमार्गाची मागणी सध्या पुढे आली आहे. संगमेश्वर येथून सातारा येथे आंबाघाट चढून मलकापूर कोकरूड असे गेल्यास 180 किमी अंतर आहे. चिपळूण येथून कुंभार्ली घाट चढून पाटण उंब्रज असे गेल्यास 167 किमी अंतर आहे. अशा परिस्थितीत संगमेश्वर येथून थेट पाटण येथे जाऊन पुढे गेल्यास संगमेश्वर-सातारा हे अंतर आणि अर्थातच पुढे पुणे पर्यंतचे अंतर कमी होईल, ही अपेक्षा म्हणजे नवल नाही; मात्र खरेच तसे शक्य आहे का? ते तपासून पाहावे लागेल, असे प्रतिपादन करणारा लेख......

- डॉं. केदार.


संगमेश्वर-पाटण घाटमार्ग ः एक मृगजळ

संगमेश्वर-पाटण घाटमार्ग तयार झाल्यास संगमेश्वर-पाटण अंतर 46.600 किमी होईल, असा काहींचा दावा आहे. सरळ रेषेतील अंतर आणि रस्त्याचे अंतर यात गफलत झाल्याचे वाटते. गुगल नकाशाद्वारे संगमेश्वर-पाटण सरळ रेषेतील अंतर 46 किमी भरते हे नक्कीच; मात्र संगमेश्वर येथून नेरदवाडीपर्यंत आणि तिथून पुढे उंच डोंगर चढून जाणारा रस्ता हा वळणांचाच असेल. उदाहरणार्थ, कुंभार्लीमार्गे जाताना खेर्डी – घाटमाथा हे अंतर रस्त्यावर 30 किमी आहे तर सरळ रेषेतील अंतर 20 किमी आहे. म्हणजेच प्रत्यक्षातील अंतर हे दीडपट तरी आहे. त्याप्रमाणे संगमेश्वर–पाटण अंतर प्रत्यक्षात 46 किमी न होता किमान 69 किमी तरी होईलच. पाटण-सातारा हे अंतर 61 किमी आहे ते तसेच राहील. म्हणजे तसा घाट झाल्यास संगमेश्वर पाटण अंतर 130 किमी होऊ शकते. म्हणजे सध्या जवळच्या मार्गापेक्षा 37 किमीची बचत होऊ शकते. नवे अंतर हे जुन्या अंतराच्या साधारण 78 टक्के आहे. म्हणजेच मालवाहतुकीच्या खर्चात बचत होणार आहे. ते अंतर कमी झाल्यामुळे केवळ इंधन खर्चात होणार आणि तीही केवळ 22 टक्के. हे आकडे केवळ सातारा येथील अंतरासाठी आहेत आणि संगमेश्वर-पाटण अंतर प्रत्यक्ष 130 किमी असेल या गृहितकावर आधारित आहेत. प्रत्यक्षात अंतर जास्ती असू शकते. या नव्या रस्त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होतील, असे सांगितले जात आहे. संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तू केवळ सातारा जिल्ह्यातून येत नाहीत तर अन्य अनेक ठिकाणांहून येतात. त्यामुळे त्याचा विचार करता नव्या रस्त्यामुळे होणारी बचतीची टक्केवारी आणखी कमी होणार आहे, असे वाटते.
हा रस्ता बांधायचा ठरवल्यास तांत्रिक अडथळे आणि खर्चाचा विचार करावा लागेल. नेरदवाडीसमोर (समुद्रसपाटीपासून 400 मीटर उंचीवर) असलेला साधारण 500 मीटर उंचीचा कडा चढून वर जाणारा रस्ता करणे गरजेचे आहे. कुंभार्ली आणि आंबा हे घाट इतक्या उंचीपर्यंत चढून न जाताच (साधारण 600 मीटरपर्यंत) आपल्याला सह्याद्री पर्वताच्या पलीकडे पोहोचवतात, असे गुगलवर उपलब्ध उंचीच्या नकाशावरून दिसते. त्यामुळे नेरदवाडी येथून निघणारा घाट हा आधुनिक तंत्रज्ञानाने शक्य झाला तरी अतिशय खर्चिक होणार. तेव्हा उपयुक्तता आणि खर्च याचे गणित मांडणे इष्ट ठरेल.
संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्री पर्वताला लागून असणाऱ्या गावांत रस्ते, दळणवळणाची साधने, मोबाईल कवरेज यांच्या समस्या आहेत. त्यामुळे अशा गावांतून लांबचे रस्ते गेल्यास त्याचा चांगला परिणाम त्या गावांवर होऊ शकतो, हेही योग्य. त्याकरिता तिथल्या गावांतील रस्त्यांचा दर्जा सुधारणे, रुंदीकरण करणे, अनेक नद्या-नाल्यांवर पूल बांधणे, एसटीच्या सेवांत वाढ, विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत प्रवासासाठी थेट अनुदान, मोबाईल कवरेजसाठी खासगी नेटवर्क कंपन्यांचा पाठपुरावा आणि उपलब्ध बाजारपेठेची त्यांना ओळख असे उपाय योजता येतील. रस्ते रुंदीकरण, नवे पूल आणि मोबाईल कवरेज यात अधिक यश येण्याची शक्यता आहे.