असे करा माती परीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असे करा माती परीक्षण
असे करा माती परीक्षण

असे करा माती परीक्षण

sakal_logo
By

कृषी सदर

swt१७२.jpg
६२९४५
डॉ. विलास सावंत

असे करा माती परीक्षण
लीड
सामान्यतः मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला तरी चालतो; परंतु वर्षांतून दोन ते तीन वेळा पिके घेतल्यास मातीचा नमुना दरवर्षी घेणे आवश्यक असते. ‘नत्र’ या अन्नद्रव्याचे प्रमाण दरवर्षाला बदलत असते. त्यामुळे नत्राचे प्रमाण तपासण्यासाठी मातीचा नमुना दरवर्षी घ्यावा. खरीप पीक काढल्यानंतर लगेच किंवा एप्रिल ते मेमध्ये मातीचे नमुने घ्यावेत. पिकाला रासायनिक किंवा सेंद्रिय खत घातल्यावर तीन महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. नमुना ओला असल्यास सावलीत वाळवून नंतर पिशवीत भरावा. मातीचा नमुना घेताना क्षेत्र, विस्तार, स्थान, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके व जलसिंचन यांचा प्रामुख्याने विचार करून त्यानुसार नमुना घ्यावा.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
.............
नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावेत. उदा. चोपण जमीन, कोरडवाहू जमीन, पाणथळ जमीन, उतारावरची जमीन याप्रमाणे प्रत्येक जमिनीचे वेगवेगळे नमुने घ्यावेत. नमुना काढण्यासाठी टिकाव, फावडे, खुरपे किंवा आगर, घमेली, पॉलिथिन किंवा ताडपत्री तुकडा, गोणपाट, कापडी पिशवी या वस्तूंची जरुरी असते. पाण्याच्या पाटाजवळील जागा, विहिरीजवळील जागा, जनावरे बसण्याच्या जागा, खत आणि कचरा टाकण्याच्या जागा, दलदलीच्या जागा, बांध व झाडाखालील जागा इत्यादी ठिकाणचा मातीचा नमुना घेऊ नये. मातीचा नमुना प्रतिनिधिक असावा. भाग पाडलेल्या शेताच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस पाच ते सहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषा जमिनीच्या लांबी-रुंदीप्रमाणे असाव्यात. प्रत्येक वळणावर टिकाव किंवा खुरप्याने खुणा कराव्यात. खुणा केलेल्या जमिनीवरील सर्व पालापाचोळा, तण काढून टाकावेत. त्या ठिकाणी २२.५ सें.मी. (वीतभर) चौकोनी खोल खड्डा घ्यावा. खड्यातील सर्व माती हाताने अगर खुरप्याने काढून टाकावी. खड्ड्याचा आकार साधारणपणे इंग्रजी ‘व्ही’ अक्षराप्रमाणे असावा. खड्याच्या एका बाजूची साधारण ४ सें.मी. जाडीची माती खुरप्याने तासून घ्यावी व ती माती घमेल्यात गोळा करावी. अशा पद्धतीने १० ते १२ ठिकाणांहून गोळा केलेली माती पोलिथिन किंवा ताडपत्रीच्या तुकड्यावर पसरवून चांगली मिसळावी. मातीत असणारे खडे व वनस्पतीची मुळे काढून टाकावीत आणि मोठी ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर त्याचे चार समान भाग पाडून समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत. शेवटी दोन ओंजळींएवढी किंवा अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत ही क्रिया करावी. नंतर हा मातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावा.
विविध पिकांकरिता वेगवेगळ्या खोलीचे नमुने घ्यावेत. उदा. हंगामी पिके (भात, नागली, भुईमूग इत्यादी) : २० ते २५ सें.मी.; बागायती पिके (ऊस, केळी इत्यादी): ३० ते ४० सें.मी.; फळबाग पिके (आंबा, काजू, नारळ, सुपारी इत्यादी) : ६० सें.मी. नमुन्यासोबत नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता, नमुना किती खोलीपर्यंत घेतला त्याची माहिती, जमिनीचा उतार, जमिनीचा निचरा व पुढील हंगामात घ्यावयाची पिके इत्यादी माहिती देणे आवश्यक असते. याप्रमाणे माहिती भरून झाल्यावर मातीचा नमुना जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या माती परीक्षण प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात आहेत.