रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरात बेकायदेशीर डिझेल विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरात बेकायदेशीर डिझेल विक्री
रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरात बेकायदेशीर डिझेल विक्री

रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरात बेकायदेशीर डिझेल विक्री

sakal_logo
By

पान पाच मेन

मिरकरवाडा बंदरात बेकायदेशीर डिझेल विक्री

थेट नौकांजवळ टॅंकर उभे ; सागरी सुरक्षेलाही धोका ; मत्स्यव्यवसाय संस्था आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः मिरकरवाडा मच्छीमार बंदरात बेकायदेशीर डिझेल विक्री होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. बंदरावर डिझेल पंप असलेल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. बंदरांवर नौकांजवळ जाऊन टँकरमधून थेट डिझेल विक्री होत आहे. यामुळे सागरी सुरक्षेशीदेखील खेळ होत आहे, असा आरोप महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी केला आहे. ही बेकायेदशीर डिझेल विक्री बंद न झाल्यास मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रत्नदुर्ग मच्छीमार सहकारी सोसायटीचे दादा सुर्वे यांनी दिला.
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे डिझेल पंप मिरकवाडा बंदरावर मोठ्या संख्येने आहेत. अशा संस्थांचे सदस्य असलेल्या मच्छीमार नौकांना डिझेल पुरवठा केला जातो. या संस्थांचा डिझेल कोटा आणि परतावा बंद झाल्यानंतर संस्थांच्या डिझेल पंपांवर येणारे ग्राहक कमी झाले. ही संधी साधून मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाची कोणतीही परवानगी नसताना बाहेरच्या पेट्रोलपंप चालकांचे डिझेल टँकर बंदरावर येऊन डिझेल बेकायदेशीर विक्री करत आहेत. एका लिटरमागे १ रु. चे कमिशन देण्याचे आमिष दाखवून ही डिझेलविक्री दिवसा, रात्री सुरू होते. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, मिरकरवाडा बंदर प्राधिकरण याच्याकडे तक्रार करण्यात आली आहे तरीही कोणतीच दखल घेतली गेलेली नाही. असे मच्छीमार विकास संघाचे अध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी सांगितले.
मिरकवाडा बंदरावर रत्नदुर्ग, चंडिका, कर्ला, भाट्ये, आदर्श, कोकण, भगवती, राजीवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थांचे डिझेल पंप आहेत. या संस्थांमध्ये सदस्य असणाऱ्या नौकांना संस्थेच्या पंपावरून डिझेल दिले जाते. आता अशा सहकारी संस्थांना डिझेल कोटा आणि नौकांना परतावा देण्याचे आदेश नुकतेच शासनाकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाला प्राप्त झाले आहेत; मात्र बाहेरून येणाऱ्‍या डिझेल टँकरवाल्यांकडून एका लिटरमागे १ रु. चे कमिशन दिले जात असल्याने सहकारी संस्थांच्या डिझेलविक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर टँकरद्वारे होणारी थेट डिझेल विक्री बंद न झाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा रत्नदुर्ग सहकारी संस्थेचे पदाधिकारी दादा सुर्वे यांनी दिला आहे.

तर टॅंकरला घालणार घेराओ
मिरकरवाडा बंदरावर बेकायदेशीररित्या टँकरने डिझेलविक्री होत असल्याची माहिती संबंधित स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे; परंतु दखल घेतली जात नसल्याने आता सर्व मच्छीमार सहकारी संस्थांकडून अशा टँकरना घेराओ घालण्याचाही विचार सुरू आहे. यापूर्वीच प्रशासनाने सागरी सुरक्षेचा विचार करून टँकरद्वारे होणारी बेकायदेशीर डिझेल विक्री बंद करावी, अशी मागणी सहकारी संस्थांकडून होत आहे.


डिझेल विक्रीत काहीतरी गडबड
डिझेलच्या एका लिटरला १ रुपया ८० पैशाचा नफा मिळतो. अशावेळी टँकरधारकाला एका लिटरमागे एक रुपये कमिशन कसे परवडू शकते? त्यामुळे या डिझेल विक्रीमध्ये काहीतरी गडबड असल्याची शक्यता आहे, असे मच्छीमार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी सांगितले. या प्रकरणी स्थानिक शासकीय यंत्रणेने लक्ष न दिल्यास केंद्रशासन आणि राज्यशासनाने तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.