उपेक्षित नाटककार हिराबार्इ पेडणेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपेक्षित नाटककार हिराबार्इ पेडणेकर
उपेक्षित नाटककार हिराबार्इ पेडणेकर

उपेक्षित नाटककार हिराबार्इ पेडणेकर

sakal_logo
By

rat१८१५.txt

इये साहित्याचिये नगरी ...........लोगो

फोटो- rat१८p२.jpg-
६३१२७
हिराबार्इ पेडणेकर
rat१८p३.jpg
६३१२८
ःप्रकाश देशपांडे

उपेक्षित नाटककार हिराबार्इ पेडणेकर

दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्

जन्म कुणाच्या हाती नसतो; मात्र कर्तृत्वाने श्रेष्ठता येते असे हे संस्कृत वचन. या वचनाची सत्यता म्हणजे नाटककार हिराबार्इ पेडणेकर. हिराबार्इ या मूळ गोमंतकातील पेडणे इथल्या; मात्र त्यांचा जन्म झाला तत्कालीन संस्थान असलेल्या सावंतवाडीत. अल्पवयातच मातृछत्र हरपले आणि त्यांची मावशी भीमाबार्इ यांच्याबरोबर त्या मुंबर्इत आल्या. यांचे घराणे देवदासीचे. गोव्यात देवदासीची परंपरा मोठी. मंदिरात दिवा लावणे, झाडलोट करणे, पालखीसमोर नृत्यगायन करणे आणि कुणा धनिकाच्या आश्रयाने त्याची शेज सजवत आयुष्य वेचायचे; मात्र कांही देवदासी मुंबर्इत येऊन आपली कला आणि सौंदर्याचा उपयोग करून राहात. हिराबाईंच्या मावशी भीमाबार्इ अशीच मुंबर्इतील प्रख्यात धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या आश्रयाने राहात होत्या. (मुंबर्इ विद्यापीठातील राजाबार्इ टॉवर याच प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या देणगीतून निर्माण झाला.) स्वाभाविकच आर्थिक स्थिती चांगली होती. भीमाबार्इंनी हिराला शाळेत घालायचे ठरवले. तिथल्या मिशन हायस्कूलमधे हिराचे नाव दाखल करण्यात आले. या शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. देवदासी असल्याने नृत्य, गायन आलेच पाहिजे म्हणून हिराबाईंना शंकरराव धुळेकर यांची शिकवणी लावली. पुढे गानतपस्वी भास्करबुवा बखले आणि फैयाजखाँ यांच्याकडून त्या गाणे शिकल्या.
भीमाबार्इ यांच्याकडे अनेक नामवंत लेखक कलाकार यांचे येणे-जाणे होते. गोविंद बल्लळ देवल यांच्याशी भीमाबाईंचे घरोब्याचेच नाते असल्याने हिराबार्इंनासुद्धा नाटकाची गोडी लागली. त्या वेळी देवलांचे ’शारदा‘ नाटक गाजत होते. आपणही देवलांसारखे नाटक लिहायचे असे वाटून नाट्यलेखनाचा प्रयत्न करायच्या. मावशीला मात्र हिराने आपल्यासारखेच कुणा रसिक आणि धनिकाची शेज सजवावी, असे वाटत असे. नट, नाटककार त्यांची व्यसने, आर्थिक ओढाताण तिने पाहिली असल्याने हिराने या मंडळीपासून दूर राहावे यासाठी मावशी प्रयत्न करायची. भीमाबार्इंचे घर हे अनेकांचे भेटीचे ठिकाण होते. हिराबार्इंना तर ही मेजवानीच वाटायची. किर्लोस्कर, गडकरी, बालगंधर्व, मामा वरेरकर, नरसिंह चिंतामण केळकर, कवी रेंदाळकर, नानासाहेब फाटक अशी दिग्गज मंडळी तिथे यायची. मराठी रंगभूमीचा तो उत्कर्षकाळ होता. संगीत नाटक प्रेक्षकांची पसंती असल्याने नाट्यपदांच्या चालीसाठी नाटककार अशा गाणाऱ्या स्त्रियांकडे येत. त्यांच्याकडून चिजा घेऊन त्यावर शब्दरचना करत. अनेकवेळा शब्दांची ओढाताण होऊन नाट्यपदे क्लिष्ट होत. गडकऱ्यांनी या विषयावर खुमासदार लेख लिहिला आहे. भीमाबार्इंच्या घरी होणाऱ्या साहित्यविषयक चर्चा ऐकतच हिराबार्इ नाट्यलेखन करू लागल्या.
महाभारतातील जयद्रथाची कथा समोर ठेवून त्यांनी आपले पहिले नाटक ‘जयद्रथ विडंबन’ हे १९०५ ला लिहिले; मात्र या नाटकाला रंगमंचावर येण्याचे भाग्य लाभले नाही. याच काळात हिराबाईंचा परिचय नटवर्य नानासाहेब जोगळेकर यांच्याशी झाला. नानासाहेब किर्लोस्कर नाटकमंडळीचे नायक होते. देखणे, रूबाबदार नानासाहेब हिराच्या प्रेमात पडले. नाटकमंडळीचा मुक्काम मुंबईत असला की, नानासाहेब हिराकडे येत. १९०८ ला हिराबाईंनी ‘संगीत दामिनी’ हे नाटक लिहिले. आपले हे नाटक रंगभूमीवर यावे अशी तीव्र इच्छा त्यांना वाटत होती. किर्लोस्कर नाटकमंडळीचे आधारस्तंभ नानासाहेब असल्याने किर्लोस्कर मंडळी हिराचे नाटक रंगमंचावर आणतील, असे नानासाहेबांना वाटत होते; मात्र एका ‘नायकिणीचे नाटक’ अब्रह्मण्यम् तोंडावर होकार; मात्र प्रत्यक्ष नकार हा खेळ सुरू होता. नानासाहेबांप्रमाणेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचेही येणे-जाणे आणि कोल्हाटकरांच्या प्रतिभेचे आकर्षण असल्याने आपली ही नाट्यकृती कोल्हटकरांना अर्पण करावी, असे हिराबार्इंना वाटले; मात्र समाज काय म्हणेल? नायकिणीने नाटक अर्पण केले तर समाजात छीथू होर्इल, या भीतीने कोल्हटकरांनी अर्पण पत्रिकेला नकार दिला; मात्र मराठी रंगभूमीवर आपल्या तेजाने तळपणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या नाटक कंपनीने समाज काय म्हणेल याचा विचार न करता मोठ्या उत्साहाने ‘संगीत दामिनी’ हे नाटक रंगभूमीवर आणले. ललितकलेने ‘संगीत दामिनी’ चा पहिला प्रयोग १९११ ला नाशिकला केला. विशेष म्हणजे कंपनीने संगीतकार आणि लेखिका म्हणून आपल्या जाहिरातीत हिराबाईंचा सन्मानपूर्वक उल्लेख केला. मराठी रंगभूमीवर स्त्री नाटककाराचे पहिले नाटक हिराबाईंचे लेखन आणि संगीतसुद्धा.
‘संगीत दामिनी’ वर अनेक अंकात परीक्षणे आली आणि हिराबाईंच्या नावाचा नाट्यक्षेत्रात दबदबा वाढला. नाटकाप्रमाणेच त्यांच्या कविता, कथांनाही प्रसिद्धी मिळायला लागली. दुर्दैवाने याच काळात हिराबार्इंना मद्याचे व्यसन लागले. त्यातच त्या ज्यांच्यावर निरतिशय प्रेम करत होत्या त्या नानासाहेब जोगळेकरांचे अचानक निधन झाले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही फारशी आस्था दाखवली नाही. आयुष्य वैराण होत चालले होते. एकतर कलावंत नायकिणी म्हणजे फक्त उपभोगासाठीच असतात अशी समाजमनाची धारणा; मात्र अशा कठीण काळात त्यांना भक्कम हात देण्यासाठी पुढे आले कृष्णाजी तथा बाबूजी नेने. गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे हे गृहस्थ रेल्वेखात्यात मोठ्या अधिकाराच्या जागेवर होते. ते भेटले आणि हिराबाईंचे आयुष्यच बदलले. नेने यांनी ‘यापुढे नाटक, गाणे, नृत्य, सोडून ये’, असे सांगितले आणि प्रसिद्धीचा झगमगाट, थोरा-मोठ्यांचे येणे-जाणे सगळ्यावर तुळशीपत्र ठेवून हिराबाईंनी मुंबर्इ सोडली. त्या पालशेतला आल्या. नेन्यांची शेतीवाडी पाहू लागल्या. बागेला पाणी कमी पडतेय म्हणून स्वतः उभी राहून विहीर खणून घेतली. विहिरीला पाणी लागले. बाबूजी नेने यांनी कौतुकाने विहिरीवर नामफलक लिहून ‘हिराबार्इ कृष्ण’ असा उल्लेख केला. एक-दोन नव्हे ३६ वर्षे तीन तपे हिराबार्इ पालशेतला राहिल्या. बाबूजी नेने यांनी हिराबार्इंना पत्नीपदच दिले होते. घरीदारी हिराबाईंचा उल्लेख ‘तार्इ’ असा व्हायचा. नेनेसुद्धा मुलांना पत्र लिहिताना ‘सौ. तार्इ’ असा त्यांचा उल्लेख करायचे. अखेर हिराबाईंना कर्करोगाने गाठले. कानामागे गाठ झाली आणि औषधोपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. १८ ऑक्टोबर १९५१ ला प्रसिद्ध महिला नाटककार हिराबार्इ कृष्णाजी नेने यांनी पालशेत येथे अखेरचा श्‍वास घेतला.
बालकवींनी ज्यांच्यावर ‘गर्द सभोवती रानसाजणी तू तर चाफेकळी’ ही कविता लिहिली. ज्या हिराबाईंनी २८ ऑगस्ट १९०५ ला झालेल्या महाराष्ट्र नाटक मंडळाच्या संमेलनाचे स्वागतगीत लिहून स्वतः सादर केले, ज्यांनी कोल्हटकरांच्या ‘प्रेमशोधन ’आणि गडकऱ्यांच्या ‘पुण्यप्रभाव’ नाटकाला संगीत दिले त्या हिराबार्इंच्या निधनाची वार्तासुद्धा साहित्यविश्‍वाला कळलीच नाही.
हिराबाईंवर नंतर अनेकांनी लिहिले. वसंत काणेकरांनी ‘कस्तुरीमृग’ हे नाटक आणि विजयकुमार नार्इक यांचे ‘पालशेतची विहीर’ ही नाटके आली. विशेष म्हणजे शिल्पा सुर्वे यांनी आद्य महिला नाटज्कार हिराबार्इ पेडणेकर हे हिराबार्इ आणि कृष्णाजी नेने यांना यथार्थ न्याय देणारे चरित्र लिहिले आहे. मराठी साहित्यविश्‍वाला मराठी रंगभूमीवर पहिले नाटक सादर करणाऱ्या स्त्री लेखिका हिराबार्इ पेडणेकर यांचा उल्लेख करावाच लागला.