टंचाई आराखडे बनवण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टंचाई आराखडे बनवण्याचे आदेश
टंचाई आराखडे बनवण्याचे आदेश

टंचाई आराखडे बनवण्याचे आदेश

sakal_logo
By

45768
--
KOP21K11611-2
--

टंचाई आराखडे बनवण्याचे आदेश

प्रशासन सतर्क; निवारण कामे हाती घेणार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सूचना

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईबाबत जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झाले असून पाणी टंचाई निवारणार्थ कामे तातडीने करता यावीत, यासाठी सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले आहेत.
जिल्ह्याच्या वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील स्थिर पाणी पातळीचा अभ्यास व यावर्षी सप्टेंबर अखेर पडलेल्या पर्जन्यमानाच्या आधारे दिलेल्या अहवालानुसार उन्हाळ्याच्या पूर्वर्धापर्यंत जिल्ह्यात कोठेही पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाही. परंतु, जिल्ह्याची भौगोलिक व स्थानिक परिस्थिती लक्षात घेता उन्हाळ्याच्या उत्तरार्धात जिल्ह्याच्या काही भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अहवाल दिला आहे. शासन आदेशानुसार टंचाई कालावधीत काही गाव, वाड्यांमध्ये तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करावा व ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, जिल्ह्यातील गाव-वाड्यांना पाणी टंचाई भासण्यापूर्वी पाण्याचा मुबलक पुरवठा होईल, या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. शासनाच्या विविध कार्यक्रमाखाली पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झालेली आहेत अशा गाव, वाड्यांचा समावेश पाणी टंचाई आराखड्यात करू नये. शासन निकषांमध्ये बसणारी कामेच आराखड्यात समाविष्ट करावीत. पाणी टंचाई आराखडा तयार करताना ग्रामसभेचा ठराव व प्रपत्र अ सोबत पाठविण्यात यावे. जेणेकरून पुढील कार्यवाहीस विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी विहित मुदतीत सर्व तालुक्यातून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा २०२२-२३ सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर यांनी दिली.
-----------
चौकट
गतवर्षी पाणी टंचाई नाही
जिल्ह्यात गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात कच्चे व वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. याचे फलित जिल्ह्यात दिसून आले. गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोठेही पाणी टंचाईची समस्या जाणवली नाही. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सतर्क राहून संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आखल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाणीटंचाई जाणवली नसल्याने पाणीटंचाई आराखडे बनविण्यात आले नव्हते.
-----------
कोट
यावर्षी संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता सर्व तालुक्यांना संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आराखडे प्राप्त होताच संपूर्ण जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा २०२२-२३ तयार करून जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात येईल.
- संतोष सावर्डेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग