''रेल्वे''ला जोडणारे रस्ते काँक्रिटचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''रेल्वे''ला जोडणारे रस्ते काँक्रिटचे
''रेल्वे''ला जोडणारे रस्ते काँक्रिटचे

''रेल्वे''ला जोडणारे रस्ते काँक्रिटचे

sakal_logo
By

63261
मुंबई ः येथे शुक्रवारी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना सार्वजनिक बांधकाममंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण.


रेल्वेला जोडणारे
रस्ते काँक्रिटचे
---
रवींद्र चव्हाण; तातडीने काम सुरू होणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे सुशोभीकरण येत्या सात दिवसांत सुरू करा, कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांबाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईतील बैठकीत दिले.
चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे. एस. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एन. राजभोज, एस. एन. गायकवाड, ए. ए. ओटवणेकर, ए. एम. रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्य रेल्वेचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगत, माजी आमदार प्रमोद जठार, कोकण रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विजय केनवडेवर, सचिन वहाळकर आदी उपस्थित होते. विमानतळांच्या धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करावे, कोकण रेल्वे प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मार्गावर हजारो प्रवाशांची यातायात आहे; पण कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. काही अपवाद वगळता स्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे सर्व स्थानके सुसज्ज करावीत. विलंब न लावता येत्या सात दिवसांत कार्यवाही सुरू करण्याचेही चव्हाण यांनी निर्देश दिले.
ते म्हणाले, ‘‘स्थानकांकडे येणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. ते रस्ते क्राँकिटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. कोकणवासीय व चाकरमान्यांसाठी रस्ते करण्याची आमची पूर्ण तयारी असून, यादृष्टीने कोकण रेल्वे प्रशानाने आम्हाला लवकरात लवकर ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. ते मिळताच युद्धपातळीवर काम होईल.’’

रत्नागिरी, कणकवलीत रेल्वे पोलिस ठाणे
कोकण रेल्वेमार्गावर अपघातांची शक्यता असते. दरडींच्या अनेक दुर्घटनाही होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी परिसरात सुसज्ज पोलिस ठाणे व पोलिस चौकीची मागणी सातत्याने रेल्वे पोलिसांनी केली आहे; परंतु कोकण रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे, अशी नाराजी मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यामुळे रत्नागिरी व कणकवली येथे दोन स्वतंत्र पोलिस ठाणे व्हावीत, याच परिसरात आठ पोलिस चौक्या नव्याने करण्याबाबात कोकण रेल्वेने तातडीने योग्य जागा द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

या रस्त्यांचे काँक्रिटीकरण
राजापूर रोड, सौंदळ, रत्नागिरी, भोके, आडवली, विलवडे, सावर्डा, चिपळूण, कामथे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड, आयनी, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, कणकवली, नांदगाव, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, सिंधुदुर्गनगरी.

‘तुतारी’ला नांदगावात थांबा?
रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा जंक्शनऐवजी दादर रेल्वेस्थानकापर्यंत करण्याबाबत तसेच सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. नांदगाव स्थानकावरील रो-रो सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.