नेरुरमध्ये अनधिकृत प्रकल्पांमुळे प्रदूषण; संध्या तेरसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pollution due to unauthorized projects in Nerur Sandhya Terse
नेरुरमध्ये अनधिकृत प्रकल्पांमुळे प्रदूषण

नेरुरमध्ये अनधिकृत प्रकल्पांमुळे प्रदूषण; संध्या तेरसे

कुडाळ : नेरुर व एमआयडीसी क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत प्रकल्पांमुळे हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. या प्रकल्पांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती नगरसेविका तथा भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिली. संबंधित दोन्ही प्रकल्पस्थळी गेल्यावर तेथे प्रकल्पाचा एकही अधिकारी उपलब्ध झाला नाही; मात्र तेथील दुर्गंधी उपस्थितांना सहन करावी लागली, असेही त्या म्हणाल्या. तेरसे पुढे म्हणाल्या, ‘नेरुर (ता. कुडाळ) येथे गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित बायो मेडिकल प्रकल्प सुरू आहे. रुग्णालयांमधील टाकावू कचऱ्यावर प्रक्रिया करून तो नामशेष करण्यासाठी हा प्रकल्प उभारला आहे; मात्र याला शासनाची परवानगी नाही. त्याचप्रमाणे नेरुर एमआयडीसी येथेही हा प्रकल्प आहे.

हे दोन्ही प्रकल्प नेरुरच्या हद्दीत आहेत. याबाबत संबंधित कंपनीशी चर्चा केल्यानंतर हे प्रकल्प अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते; मात्र कोणीही त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. या ठिकाणी अनधिकृतपणे रुग्णालयांमधील कचरा टाकला जातो. त्यामुळे हवेचे प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास होतो. गेली अनेक वर्षे येथील नागरिक हा त्रास सहन करत आहेत. या प्रकल्पासाठी दिलेली जमीनसुद्धा आता नापीक होत आहे. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली जाणार आहे.’ यावेळी युवा मोर्चाचे रुपेश कानडे, सचिन तेंडुलकर, रुपेश बिडये, नगरसेवक विलास कुडाळकर, नीलेश परब, राजीव कुडाळकर, अशोक कंदुरकर, अभय सामंत आदी उपस्थित होते.

‘त्या’ प्रकल्पाला वरदहस्त कोणाचा?
एमआयडीसी क्षेत्रामध्ये असलेल्या या प्रकल्पाच्या बाजूला नगरपंचायतीचा घनकचरा प्रकल्प होणार होता; मात्र या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच नेरुरवासीयांनी विरोध केला होता. आता घनकचऱ्यापेक्षाही जास्त प्रदूषण निर्माण करणारा रुग्णालयातील टाकाऊ कचरा प्रकल्प येथे उभा राहिला आहे. तरीही याला नेरुर येथील कोणीही विरोध केला नाही. याला कोणाचा वरदहस्त? हे उघड होणे गरजेचे आहे, असे नगरसेविका तेरसे यांनी सांगितले.

नेरुर येथील प्रकल्प बंद करण्यासंदर्भात संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. असे असूनही कंपनीने प्रकल्प सुरू ठेवला आहे. यापुढे ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाकाऊ कचरा येत होता; मात्र आता इतर जिल्ह्यांतीलही टाकाऊ कचरा येथे टाकला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी आहे.
- प्रदीप नाईक, जमीन मालक, नेरुर

टॅग्स :SindhudurgKokanpollution