‘आमचा मालवण’ अभियान २५ पासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आमचा मालवण’ अभियान २५ पासून
‘आमचा मालवण’ अभियान २५ पासून

‘आमचा मालवण’ अभियान २५ पासून

sakal_logo
By

‘आमचा मालवण’ अभियान २५ पासून

मुख्याधिकाऱ्यांची माहिती; शहरातील मुख्य ठिकाणांचे सुशोभीकरण करणार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : देशातील सर्व शहरे कचरामुक्त करणे, घनकचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, हागणदारी मुक्त शहरे, शाश्वत स्वच्छता आदी उपक्रम लोकसहभागाने साध्य करण्यासाठी केंद्राने ‘स्वच्छ भारत’ अभियानाची अंमलबजावणी केली. आहे. तर शहरे स्वच्छ झाली तरच सुंदर दिसतील, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरांमध्ये ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२’ आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने येथील पालिकेतर्फे ‘आमचा मालवण’ अभियान २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत शहरात राबविले जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य ठिकाणांचे सौंदर्यीकरण व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली.
शहर सौंदर्यीकरण स्पर्धेसोबत पालिकेकडून हद्दीमध्ये विविध ठिकाणी सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यात शहरातील मुख्य चौक सुशोभीकरण, उद्याने, अस्तित्वातील कारंजा नूतनीकरण, ब्रिजचे रंगकाम, पालिकेच्या विहिरींचे सौंदर्यीकरण, शहरातील ऐतहासिक व प्रमुख वारसास्थळांचे सुशोभीकरण, पालिका हद्दीतील विविध सार्वजनिक परिसर विद्युत रोषणाई करणे, स्ट्रीट फर्निचर एकसंधता, शहरातील सार्वजनिक ठिकाणे, भिंतीदर्शनी भाग, भिंती इत्यादी ठिकाणी स्वच्छता व जनजागृतीबाबत संदेश लिहिणे, आकर्षक थ्रीडी पेंटिंग, रॉक पेंटिंग, नाट्यगृह येथे म्युरल/स्कल्पचर आर्टस् डिझाईन करणे, जीव्हीपी ठिकाणाजवळ व्हर्टिकल गार्डन तयार करणे ही कामे पालिकेमार्फत मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या मंजुरी व मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवर पालिकेच्या ‘आमचा मालवण’ अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मालवण शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने येथील पर्यटनास चालना मिळावी, या हेतूने शहराची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सुशोभीरण, शहराचा समृद्ध इतिहास, येथील कला, सांस्कृतिक वारसा या घटकांना उजाळा देण्याच्या अनुषंगाने अशा स्वरुपाच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांचा उद्देश शहरातील सर्व नागरिक, सेवाभावी संस्था, व्यावसायिक, उद्योजक, शिक्षण संस्था, महिला, पत्रकार या सर्वांना सहभागी करून कचरामुक्त शहराचे ध्येय्य साध्य करण्यासाठी लोकचळवळ तीव्र करणे, स्वच्छ वर्तन आणि संबंधित कृती संस्थात्मक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहोचून शहरात जागरुकता निर्माण करणे, हा आहे. सर्व अठरा स्पर्धांसाठीची स्पर्धक नोंदणी २५ पासून सुरू होणार आहे. स्पर्धक नोंदणी या सर्व स्पर्धांमध्ये प्रत्यक्ष पालिका येथे तसेच गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईनसुद्धा करता येईल. उत्तम कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना रोख बक्षिसे, सन्मान चिन्हे व प्रशस्तिपत्रके देऊन पालिकेकडून गौरविले जाणार आहे.
स्वच्छ प्रभाग स्पर्धा, इंस्टाग्राम, फेसबुक रिल्स बनविण्याची स्पर्धा, कचऱ्यापासून कलाकृती बनविण्याची स्पर्धा (टॉयकॅथॉन), स्वच्छता चॅम्पियन ही स्पर्धा आकर्षणाचा विषय असणार आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात रिल्स बनविण्याची स्पर्धा युवकांचा सहभाग वाढवून आकर्षणाचा विषय ठरणार असल्याचे बोलले जात आहे. स्वच्छता चॅम्पियन या स्पर्धेच्या माध्यमातून शहर स्वच्छतेबाबत विशेष कार्य करणाऱ्या तीन महिला व तीन पुरुषांना स्वच्छता चॅम्पियन हा किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘टॉयकॅथॉन’, स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना राज्य व देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. अभियानांतर्गत आयोजित स्वच्छ स्पर्धांद्वारे शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, हॉटेल्स, शासकीय कार्यालये, रहिवासी संकुले, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर या सर्वांचे स्वच्छतेबाबतच्या विविध निकषांच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे.
..................
विविध स्पर्धांचे आयोजन
स्वमालकीची विहीर सुशोभीकरण स्पर्धा, लोगो डिझाईन स्पर्धा, उत्कृष्ट सफाई कर्मचारी, वेस्ट टू वंडर स्पर्धा, स्वच्छता चॅम्पियन, जिंगल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज, स्वच्छ हॉटेल स्पर्धा, स्वच्छ शाळा स्पर्धा, स्वच्छ आरोग्य (दवाखाने, रुग्णालये) सुविधा, स्वच्छ निवासी संकुल स्पर्धा, इंस्टाग्राम, फेसबुक रिल्स मेकिंग स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, भित्ती सुशोभीकरण स्पर्धा, सर्वोत्कृष्ट बचतगट स्पर्धा, स्वच्छ शासकीय कार्यालय स्पर्धा, स्वच्छ सलून, स्वच्छ ब्युटीपार्लर आदी स्पर्धा या उपक्रमांतर्गत आयोजित केल्या आहेत.