झोपड्यांमध्ये जुळले हरवलेले संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपड्यांमध्ये जुळले हरवलेले संवाद
झोपड्यांमध्ये जुळले हरवलेले संवाद

झोपड्यांमध्ये जुळले हरवलेले संवाद

sakal_logo
By

63369
चिंदर ः गावपळणीदरम्यान भजनात रमलेले ग्रामस्थ.
63370
चिंदर ः मच्छी भोजनाची तयारी करताना महिला.
63371
चिंदर ः माळरानावरील झोपड्यांना मिळालेले घराचे स्वरूप.

झोपड्यांमध्ये जुळले हरवलेले संवाद

फुगड्या, भजनांनी रंगत; चिंदरवासीय लुटताहेत गावपळणीचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १९ ः हल्ली धावपळीच्या आणि मोबाईल युगात कुटुंबातील संवाद हरवत चालला असताना शेजाऱ्यांशी गप्पा कुठल्या? मात्र, चिंदर गावपळणीमुळे वेशीबाहेर रानावनात झोपड्या उभारून एकत्र राहणाऱ्या ग्रामस्थांकडे मोकळा वेळ भरपूर असल्याने हरवलेले संवाद पुन्हा जुळले आहेत. भजने, फुगड्या यात रंगून गेलेल्या ग्रामस्थांनी ताव मात्र चिकन-माशांवर मारला.
शुक्रवारी (ता. १८) दुपारनंतर गावची गावपळण सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांकडे धाव घेतली. पहिला दिवस आवराआवर आणि स्वयंपाकात गेल्याने अन्य वेळी कामधंद्याच्या धावपळीत गाठभेट सुद्धा दुर्मिळ झालेल्या चिंदरवासीयांनी शनिवारी एकत्र बसून गप्पा मारण्यात वेळ घालवला. राहुट्यांबाहेर गप्पांचे फड रंगलेले दिसून येत होते, तर महिला मंडळी सामूहिक जेवणाच्या तयारीत रमल्या होत्या. चाकरमानीही मोठ्या प्रमाणात गावपळणीत सहभागी झाल्याने मुंबईकर महिलाही मुंबईचा तोरा बाजूला ठेवून साफसफाईत गुंतलेल्या दिसून येत होत्या. चिंदर-पडेकाप लगतच्या त्रिंबक जंगलमय भागात झोपड्या उभारून राहणारे चिंदर-अपराजवाडीतील ग्रामस्थही धम्माल मस्तीत गावपळणीचा आनंद लुटत आहेत.
---
कोट
आम्ही सर्व पंचवीस कुटुंबे गावपळणीनिमित्त एकत्रच राहत आहोत. सर्व एकत्र जेवण करून गावपळणीचा आनंद लुटत आहोत. येथे सर्व एकत्र मिळून राहण्याचा आनंद पैसे मोजून केलेल्या पिकनिकमध्येही मिळणार नाही, असा आहे.
- संतोष अपराज, अपराजवाडी
---
कडाक्याच्या थंडीतही आनंद
मुंबईहून पहिल्यांदाच गावपळणीचा अनुभव घेण्यासाठी आलेले रंजन अपराज, वैशाली अपराज सांगतात, ‘‘आम्ही गावपळणीबाबत ऐकून होतो; मात्र कामाच्या व्यापामुळे सहभागी होता येत नव्हते. यावर्षी आम्ही सहभागी झालो आहोत. येथील झोपड्यांत सर्व मिळून-मिसळून राहण्याचा आनंद मुंबईच्या सुखवस्तू घरालाही येणार नाही.’’ एकंदरीत, सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीलाही न जुमानता चिंदरवासीय मजेत गावपळणीचा आनंद लुटत आहेत.