रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशनची कुर्मगती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशनची कुर्मगती
रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशनची कुर्मगती

रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशनची कुर्मगती

sakal_logo
By

rat२०p१४.jpg
६३५६१
रत्नागिरीः पानवल येथील पाणी योजनेची पूर्ण झालेली टाकी.
----------
जिल्ह्यात जलजीवन मिशनची कुर्मगती
४६९ पाणी योजनांच्या कामाचे आदेश; विविध कारणांमुळे ७२ गावांचा नकार
रत्नागिरी, ता. २० ः केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अभियान रत्नागिरी जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये १ हजार ४७५ गावांच्या योजनेचा आराखडा तयार केला असून त्यावर सुमारे साडेसातशे कोटी रुपये नळपाणी योजनेसाठी खर्च केले जाणार आहे; मात्र या योजनेचे काम कुर्म गतीने सुरु असून ४६९ गावांच्या कामांना वर्कऑर्डर मिळाल्या आहेत. जागेच्या अभावासह अन्य कारणांमुळे ७२ गावांनी योजना राबविण्यास नकार दिला आहे.
जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतीत ३ लाख ४७ हजार ९०० ग्राहक असून आतापर्यंत विविध योजनांमधून १ लाख ७६ हजार ग्राहकांच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवले जात आहे. उर्वरित सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात मार्च २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दीष्ट हर घर नल से जल या महत्त्वाकांक्षी योजनेतून निश्‍चित केले आहे. त्यासाठी देशाच्या अंदाजपत्रकात पुरेशा निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यामुळे जिल्हास्तरावर त्याचा आढावा घेतला जात आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून त्याची कसून अंमलबजावणी केली जात आहे. कोकणातील भौगोलिक क्षेत्राचा विचार करता अनेक गावांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यासाठी प्रत्येक गावांचा आराखडा तयार करुन पाणी पुरवठ्यासाठी बंधारे बांधणे, नवीन विहिरी उभारणे, पाऊस पाणी संकलन टाकीच्या माध्यमातूनही पाणी योजना राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामधून प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी दिले जाईल.
जिल्ह्यात १ हजार ४७५ पाणी योजनांपैकी १ हजार २७४ योजनांचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. ९०३ कामांची निविदा प्रक्रिया सुरु असून ४६९ योजनांना वर्कऑर्डरही दिली गेली आहे. १४ कामे पुर्ण झाली आहेत. पाच कोटीपेक्षा अधिक रकमेची अंदाजपत्रके असलेल्या योजनांची कामे जीवन प्राधीकरणामार्फत करण्यात येणार आहे. बहूसंख्य योजना या दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची असल्याने निविदा प्रक्रिया जिल्हापरिषद स्तरावर केली जात आहे. निविदा काढल्या तरीही कामे घेण्यासाठी येणाऱ्यांची ठेकेदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे निविदा वारंवार काढावी लागत आहे. जागांचा अभाव, गावामध्ये नकारात्मक भावना अशा कारणांमुळे ७२ गावांनी योजना राबविण्यास नकार दिला आहे. त्या ठिकाणी प्रशासनाला प्रचार, प्रसारासाठी नियोजन करावे लागणार आहे.

---
चौकट
पालकमंत्री सामंतांकडून आढावा
पालकमंत्री उदय सामंत यांनी जलजीवनसह केंद्रशासनाच्या विविध योजनांच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये जलजीवन मिशनचे काम कुर्म गतीने सुरु असल्याचे आढळून आले. या कामांना चालना द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांना मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत.

----
चौकट
तालुका एकूण योजना योजनेच्या कामाचे आदेश
* चिपळूण १६२ ५८
* दापोली १७० ७८
* गुहागर ११६ २६
* खेड १९३ ४६
* लांजा ११६ ६९
* मंडणगड १०६ ४७
* राजापूर २२३ ३४
* रत्नागिरी १९६ ४३
* संगमेश्वर १९३ ६८