रत्नागिरी-हापूसचा हंगाम एक महिना लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-हापूसचा हंगाम एक महिना लांबणीवर
रत्नागिरी-हापूसचा हंगाम एक महिना लांबणीवर

रत्नागिरी-हापूसचा हंगाम एक महिना लांबणीवर

sakal_logo
By

- rat20p15.jpg-

रत्नागिरी ः रब्बी हंगामाला सुरवात झाली असून कडधान्य रुजून आली आहेत.

- rat20p17.jpg-

रत्नागिरी ः हापूस कलमांवरील पालवीला कोंब येऊ लागले आहेत.


हापूस हंगाम महिनाभर लांबणीवर?

सध्या पोषक वातावरण; जिल्ह्यात पारा घसरला

रत्नागिरी, ता. २० ः मागील आठवड्यात तापमानात चढउतार होता. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होते; मात्र गेल्या दोन दिवसात मतलई वारे वाहू लागल्यानंतर पारा घसरू लागला असून, दापोलीत १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सध्याचे वातावरण हापूसला पोषक असले, तरीही ‘ऑक्टोबर हिट’ म्हणावी तशी जाणवलेली नसल्याने आंबा हंगाम एक महिना पुढे जाण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.
उत्तरेकडून येणाऱ्‍या वाऱ्‍याचा प्रवास थांबून थांबून सुरू होता. परिणामी कोकणात मागील आठ दिवसांमध्ये थंडीची तीव्रता कमी-अधिक होती. पहाटेला थंडी जाणवत असली तरीही त्यात तेवढा जोर नव्हता. मागील आठवड्यात दापोली तालुक्यात सर्वांत कमी १३.२ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. त्यानंतर पुन्हा पारा वर चढू लागला. शनिवारपासून (ता. १९) वातावरणात बदल होऊ लागले असून, सलग दोन दिवस वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा जोर वाढला असून, हापूसला पोषक वातावरण आहे. थंडी कमी-अधिक प्रमाणात असल्यामुळे आंबा कलमांना आलेली पालवी जून होऊन त्याला मोहोर येण्याची प्रक्रिया यंदा संथगतीने सुरू होती. मात्र आता हळूहळू थंडीचा जोर वाढू लागल्याने मोहोर येण्यास आरंभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पावसाचे वातावरण होते. त्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवली नाही. झाडांच्या मुळांमधील पाणी सुकलेले नाही. या वर्षी ७० टक्क्यांहून अधिक कलमांना पालवी फुटलेली असल्याने मोहोर फुटण्यासाठी कालावधी लागणार आहे. कल्टार आणि औषध फवारणी केलेल्या कलमांना फूट येण्यास सुरुवात झाली आहे. ते प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे हंगाम एक महिना लांबेल अशी स्थिती आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. पाऊस पडला नाही, तर हापूसचा प्रवास सुकर होणार आहे. अन्यथा पुन्हा कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि औषध फवारणीचा खर्च वाढू शकतो, असे बागायतदारांचे मत आहे. दरम्यान, थंडी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी रब्बी हंगामातील शेतीला आरंभ झाला आहे. पावटे, वाल, चवळी, कुळीथ यांसह विविध प्रकारची भाजी लागवड केली जात आहे. वेळेत पेरणी केलेल्या गावांमध्ये रोपही रुजून आली आहेत.
-------------
कोट
सध्याचे वातावरण पोषक असून थंडीचा जोरही वाढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढील पंधरा दिवसांत हापूसच्या हंगामाचे चित्र स्पष्ट होईल. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्मा नव्हता. त्याचा परिणाम हंगामावर झालेला आहे.
- महेंद्र झापडेकर, आंबा बागायतदार
----
चौकट
तापमानातील चढउतार
*तारीख *कमाल *किमान
*१२ नोव्हेंबर *३२.२ *१४.५
*१३ नोव्हेंबर *३३.० *१४.४
*१४ नोव्हेंबर *३२.७ *१४.५
*१५ नोव्हेंबर *33.2 *१८.३
*१६ नोव्हेंबर *३३.३ *१६.४
*१७ नोव्हेंबर *३३.२ *१४.५
*१८ नोव्हेंबर *३२.२ *१२.४