केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू
केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू

केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू

sakal_logo
By

केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू
मुंबई : अपस्मार या रोगाला सामान्य भाषेत मिरगी किंवा फिट येणे असे ही म्हणतात. या रोगासंदर्भात संपुर्ण राज्यामध्ये फक्त केईएममध्येच शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला व्हिडिओ ईईजी विभाग नुकताच केईएम रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. या मुळे अपस्‍मार रोगावर अधिक प्रभावी उपचार होतील, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली आहे. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार हा मेंदूचा एक जुना असंसर्गजन्य आजार आहे. ज्यामुळे, प्रत्येक नागरिक प्रभावित होऊ शकतात. जगभरात ५० दशलक्ष लोकांना अपस्मार आहे. योग्य निदान आणि उपचार झाल्यास ७० टक्के लोको अपस्मार मुक्त होऊ शकतात. मात्र, यासंबंधित जनजागृती कमी असल्याने अनेकदा नागरिक योग्य उपचारांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यातून त्यांना जन्मभर व्यंगत्व किंवा गंभीर परिस्थितीत जीव ही जाऊ शकतो, असे तज्‍ज्ञांचे मत आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातील २५० नागरिकांनी शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य पूर्णत: बदलले असून, ते आनंदी आयुष्य जगत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
--
डाकरे गुरुजी उद्यानाचे सुशोभीकरण सुरू
वडाळा, ता. १७ (बातमीदार) ः दादर नायगाव येथील सदानंद जाधव मार्गावरील डाकरे गुरुजी उद्यानात रात्रीच्या वेळी गर्दुले आणि भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. तसेच घाणीचे सम्राज, सोयी-सुविधांचा अभाव आणि खेळण्यांची मोडतोड, बेरंग झालेल्या भिंती यामुळे उद्यान भकास आणि गैरसोयीची झाले होते. याकडे पालिकेने लक्ष देऊन उद्यान सुशोभित करावे, अशी मागणी मनसेचे मिलिंद पांचाळ यांनी केली होती. या समस्येची ‘सकाळ’ने दखल घेत मंगळवारी (ता. ८) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्‍यावर पालिकेला जाग आली असून उद्यानाचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
४० वर्षे जुने असलेले दादर नायगाव येथील सदाकांत जाधव मार्गावरील डाकरे गुरुजी उद्यान बाग शाळा उद्यान म्हणून ओळखले जाते. अतिशय शांतताप्रिय असे हे उद्यान आहे. या उद्यानाच्या जवळपास इतर उद्यान नसल्याने स्थानिक नागरिकांना हे उद्यान प्रिय आहे; मात्र उद्यानाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली होती. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्यानात रंगरंगोटी करण्यात यावी, विद्युत दिवे बसवण्यात यावेत तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महापालिका उद्यान विभागाकडे लेखी पत्राद्वारे मनसेचे मिलिंद पांचाळ यांनी केली होती. तसेच याबाबत ‘सकाळ’मध्‍ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्‍यानंतर पालिकेला जाग आली असून पालिकेच्या वतीने उद्यानाच्या सुशोभीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
--
काव्यवाचन स्पर्धेचा समारोप
घाटकोपर (बातमीदार) ः हिंदी विद्या प्रचार समिती, घाटकोपरचे माजी अध्यक्ष स्मृती शेष पृथ्वीराज सिंह यांच्या स्मरणार्थ हिंदी हायस्कूल येथे गुरुवारी (ता. १७) आंतरशालेय कवितावाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई आणि ठाण्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह होते; तर हिंदी हायस्कूलचे माजी प्राचार्य राजदेव सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्ञानोदय विद्या मंदिर, ठाणे येथील सतीश पाठक या विद्यार्थ्याला प्रथम, घाटकोपर येथील हिंदी हायस्कूलच्या सुहानी सिंग द्वितीय; तर मालाड येथील केजीएस सर्वोदय विद्यालयाची विद्यार्थिनी पीना सिंग हिला तृतीय पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल आयडीयूबीएस हायस्कूल भांडुपला फिरती ढाल प्रदान करण्यात आले. ज्युरीमध्ये आर. जे. महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. चंद्र प्रकाश सिंग, समाजसेवक शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव, प्रसिद्ध गझलकार संतोषकुमार सिंग यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष कुमार सिंग यांनी आपल्या गझल सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्रकुमार सिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, उपमुख्याध्यापक राजेंद्र सिंह यांनी आभार मानले; तर पर्यवेक्षक अभय प्रताप सिंग यांनी सूत्रसंचालन केले.