उमेदवार चाचपणीला सावंतवाडीत वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदवार चाचपणीला सावंतवाडीत वेग
उमेदवार चाचपणीला सावंतवाडीत वेग

उमेदवार चाचपणीला सावंतवाडीत वेग

sakal_logo
By

उमेदवार चाचपणीला सावंतवाडीत वेग

ग्रामपंचायत निवडणूक; ५२ गावांमध्ये इच्छुक सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यानिमित्ताने उमेदवारांची चाचपणी सुरू असताना गावागावात एका गटातून दुसऱ्या गटात उमेदवारीसाठी सामील होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत; मात्र बऱ्याच ठिकाणी गावातील राजकीय स्थिती पाहता राज्यातील पक्षीय समीकरणे बाजूला ठेऊन निवडणूका लढविण्याची तयारी सुरू केली जात आहे.
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येत आहे; मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही ठिकाणी उमेदवारांची शोधा शोध करावी लागणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये माजगाव, बांदा, कारिवडे, केसरी फणसवडे, ओटवणे, तिरोडा, सोनुर्ली, केसरी फणसवडे, कुणकेरी अशा काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप, बाळासाहेबांचे शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरतील. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी होणार असल्याचे बोलले जात आहे; मात्र भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार स्वबळावर लढणार असल्याचे बोलले जात आहे. काही राजकीय पक्षांनी उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. पैसा आणि सत्तेचा जोर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यात पसंती देत असल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे.
शिवसेनेमध्ये उभी फूट होऊन उद्धव ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मूळ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे; मात्र अनेक गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही उद्धव ठाकरे शिवसेनेत आहेत. सर्वच ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे शिवसेनेला उमेदवार उभे करताना भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करताना प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना अशी आघाडी करून निवडणूक लढण्याची शक्यता देखील बोलली जात आहे; परंतु महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद ग्रामीण भागात म्हणावी तशी नाही. त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी राज्यातील राजकीय समीकरणे बाजूला ठेऊन गावातील परिस्थितीवरून तेथील पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे. यामध्ये काही ठिकाणी बाळासाहेब शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्ररित्या लढत आहेत. बऱ्याच ठिकाणी उद्धव शिवसेना स्वतंत्र लढत आहेत तर भाजपासुद्धा त्याच तोडीने रिंगणात आहे.
----------
चौकट
या गावांत रणधुमाळी
सावंतवाडी तालुक्यात आजगाव, आंबेगाव, असनीये, बांदा, भालावल, भोमवाडी, चराटा, देवसू दाणोली, धाकोरे, गेळे, गुळदुवे, कलंबिस्त, कारीवडे, कास, कवठणी, केसरी फणसवडे, कोनशी दाभीळ, कुडतरकर टेम सावरवाड, कुणकेरी, माडखोल, मडुरा, माजगाव, नाणोस, नेमळे, न्हावेली, निगुडे, निरवडे, पाडलोस, पडवे माजगाव, पारपोली, रोणापाल, सांगेली, सरमळे, सातार्डा, साटेली तर्फे सातार्डा, सातोसे, सातुळी बावळट, शेर्ले, शिरशिंगे, सोनुर्ली, तळवणे, तांबोळी, तिरोडा, वाफोली, वेर्ले, वेत्ये, विलवडे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.
-------------
चौकट
पुढाऱ्यांसमोर आव्हान
आरक्षणानुसार सक्षम उमेदवार मिळविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे गावातील पुढारी नेते, मंडळांसमोर आव्हान उभे राहीले आहे. उमेदवाराअभावी काही ठिकाणी सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.