आंबोली, गेळेत खुलला ‘कारवी’चा फुलोरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली, गेळेत खुलला ‘कारवी’चा फुलोरा
आंबोली, गेळेत खुलला ‘कारवी’चा फुलोरा

आंबोली, गेळेत खुलला ‘कारवी’चा फुलोरा

sakal_logo
By

63745
63746
आंबोली ः परिसरात फुललेली कारवीची फुले लक्ष वेधून घेत आहे.

आंबोली, गेळेत खुलला ‘कारवी’चा फुलोरा

कडेकपाऱ्यांवर दर्शन; छायाचित्रणासाठी निसर्गप्रेमींची धावपळ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः पश्चिम घाटामध्ये जैवविविधतादृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आंबोली व गेळे गावांमध्ये कडेकपाऱ्यांवर उगवलेली कारवीची फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तब्बल १६ ते १८ वर्षांनी उगवणारी ही फुले पाहण्यासाठी आणि चित्रबद्ध करण्यासाठी निसर्गप्रेमींसह अभ्यासकांची पावले आंबोली, गेळेकडे वळू लागली आहेत.
याबाबत बेळगाव येथील वनस्पती अभ्यासक ऋतुजा कोलते-प्रभुखानोलकर यांनी सांगितले की, या फुलाला १६ ते १८ वर्षांनी फुलोरा येतो. उंच कडेकपाऱ्यांवर या झुडपाचा अधिवास आहे. ''कारवी'' या प्रकारामध्ये हे झुडुप ओळखले जाते. ही जात अतिशय दुर्मिळ असून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. निळ्या-जांभळ्या रंगाची ही फुले सुंदर असतात. कारवीला ''सपुष्पा स्कॉब्युक्युलाटा'' किंवा ''स्ट्रॉबेलांतस स्कॉब्युक्युलाटा'' असेही म्हटले जाते. उत्तर कर्नाटक, गोवा येथील दूधसागर, महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर आणि आंबोली तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कारवीचे अस्तित्व आढळून आले आहे. कारवीला जेव्हा फुलोरा येतो, त्यावेळी तिची पाने गळून पडतात; मात्र ती धोकादायक ठिकाणी उगवते. म्हणजेच सरळसोट कड्यांवरती कारवीचा अधिवास आहे. त्यामुळे बघताना किंवा छायाचित्र घेताना काळजी घ्यावी लागते.
आंबोलीत कारवीचे अनेक प्रकार आढळतात. त्यातल्या काही सात वर्षांनी फुलतात, तर काही बारा वर्षांनी फुलतात. काही दरवर्षी फुलणाऱ्या सुद्धा आहेत. त्यामुळे वनस्पती अभ्यासक तसेच निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह दिसून येतो. अनेक छायाचित्रकार, निसर्ग अभ्यासक यासाठी आंबोली व गेळे गावांमध्ये येत आहेत.
---
फुलांवर शोधनिबंधही...
१९८४ मध्ये ब्रिटिश अभ्यासक एन. ए. टालझन याने या फुलांवर महाबळेश्वर येथून शोधनिबंध लिहिला होता. याचा फुलोरा आणखी दोन आठवडे पाहता येणार आहे. निसर्गातील या अद्भुत आणि दुर्मिळ नजाऱ्याचा आनंद घेताना स्वतःला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी आवश्य घ्यावी, असे आवाहन आंबोलीतील मलाबार नेचर कंझर्वेशन क्लबचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांनी केले आहे.