-कामथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-कामथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार
-कामथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार

-कामथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार

sakal_logo
By

(पान २ साठी)

रणधुमाळी--लोगो

कामथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार?

दोन गट पुन्हा आमने-सामने ; सरपंच होणार महिला
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २१ ः राजकीय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या कामथे ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर आता प्रतिस्पर्धी दोन गट पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. थेट सरपंच निवडणुकीसाठी महिला आरक्षण असल्याने दोन्ही गटासाठी ही निवडणूक आव्हानात्मक बनली आहे.
चिपळूण तालुक्यातील खेर्डी, कामथे आणि पोफळी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नेहमीच संवेदनशील व राजकीय प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. यावेळी पोफळी ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळा इतिहास घडला. येथील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही राजकीय गट एकत्र आले आणि दोन पावले मागे जात येथील निवडणूक बिनविरोध करून वेगळा आदर्श घालून दिला. दादा साळवी आणि चंद्रकांत सुवार या दोन्ही नेत्यांनी केलेली ही कामगिरी तालुक्यात कौतुकास पात्र ठरली.
त्यानुसारच कामथे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरवातीपासून काही प्रयत्न सुरू करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यासाठी बैठकाही झाल्या. परंतु शेवटच्या घटकेला बोलणी फिस्कटली आणि बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल ठरले. पाच वर्षांपूर्वी येथे विजयशेठ माटे व हरी कासार अशी थेट लढत झाली होती. अत्यंत चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत विजयशेठ माटे यांनी विजय प्राप्त केला होता. त्यामुळे यावेळीही राजकीय वर्तुळाच्या नजरा कामथे ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागल्या आहेत.
पारंपरिक प्रतिस्पर्धी गट समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यासाठी गावात बैठकांचा सपाटा सुरू आहे. सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने दोन्ही बाजूकडून सुशिक्षित व ताकदवान महिलांना या निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली आहेत. त्याचबरोबर नवे आणि जुने असे चेहरे एकत्र करून सदस्यपदासाठी रिंगणात उतरवण्यात येत आहेत. यावेळी विजयशेठ माटे या निवडणुकीपासून लांब राहिले आहेत. परंतु त्यांचे पॅनेल ताकदीने निवडणुकीत उतरले असून माजी जि. प. सदस्य दिलीप माटे यांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत.
माजी सरपंच हरीभाऊ कासार यांनीही कोणत्याही परिस्थितीत मागील पराभवाचा वचपा काढण्याचा चंग बांधला असून पूर्ण पॅनेलसह ते ताकदीने मैदानात उतरले आहेत. सत्ता कायम राखण्यासाठी माटे गट सज्ज आहे. माजी सरपंच हरीभाऊ कासार यांच्या पत्नी स्वतः सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची श्यक्यता आहे. माटे गटाकडूनही उमेदवार निश्चित करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.


बिनविरोध झाल्यास इतिहास
दोन्ही गटाकडून निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात येत असली तरी ज्येष्ठ मंडळींनी अद्याप ही बिनविरोधची आशा सोडलेली नाही. अद्यापही त्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवण्यात आले आहेत. या प्रयत्नांना जर यश आले आणि निवडणूक बिनविरोध झाली तर चिपळूण तालुक्यात आणखी एक राजकीय इतिहास घडेल.