यंदा देवगड हापूसची चव मार्चनंतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा देवगड हापूसची चव मार्चनंतर
यंदा देवगड हापूसची चव मार्चनंतर

यंदा देवगड हापूसची चव मार्चनंतर

sakal_logo
By

फोटो ओव्हरसेट

63817
देवगड ः आंब्याच्या झाडांना अशा प्रकारे फुटू लागलेली पालवी.

यंदा देवगड हापूसची चव मार्चनंतर
---
हंगाम महिनाभर लांबणार; नोव्हेंबरमध्ये मोहोर नव्हे, तर फुटली पालवी

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २२ ः आंब्याला मोहोर येण्याच्या कालावधीत पालवी फुटत असल्याने जिल्हा कृषी अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या देवगड हापूसचा हंगाम महिनाभर लांबण्याची शक्यता आता अधिक ठळक झाली आहे. यंदा आंब्याची चव चाखण्यासाठी मार्चअखेरपर्यंत वाट पाहावी लागेल. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम मानला जात आहे.
जिल्ह्याच्या वातावरणात दोन-तीन दिवसांपासून बदल होऊन थंडीला सुरुवात झाली. रविवारी (ता. २०) थंडीने उच्चांक गाठला. जिल्ह्याचा पारा अगदी १३ अंश सेल्सियसपर्यंत आला. आंबा, काजू बागायतदारांसाठी हा शुभसंकेत मानला जात असला, तरी मोहोर येण्याच्या कालावधीत देवगड हापूसला पालवी फुटण्यास प्रारंभ झाला आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीला आंब्याला पालवी फुटण्यास सुरुवात होते. त्यानंतर ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून झाडांना मोहोर येऊ लागतो; परंतु यंदा नोव्हेंबर संपत आला, तरी अजूनही झाडांना मोहोर नव्हे, तर पालवी फुटत आहे. ८० टक्क्यांहून अधिक झाडांना आता पालवी फुटत असल्याचे चित्र पाहायला मिळते. अवघ्या १० ते २० टक्के झाडांना काही भागांत प्राथमिक स्थितीत मोहोर फुटत असल्याचे चित्र आहे. याचा मोठा विपरीत परिणाम यंदाच्या आंबा हंगामावर होईल. यामुळे आंबा हंगाम महिनाभर लांबण्याची शक्यता आहे.
सध्या सुरू असलेल्या थंडीचे प्रमाण किमान १३ ते १७ दिवस राहिल्यास डिसेंबरमध्ये अधिकतर झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारा आंबा हंगाम मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. हंगाम लांबल्यास त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो. नोव्हेंबरमध्ये मोहोर आल्यास झाडांवर किडरोगांचा अधिकचा परिणाम होत नाही. त्यानंतर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. किनारपट्टी तालुक्यातील देवगड हापूस मार्चपासून बाजारपेठेत उपलब्ध होतो. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील आंबा एप्रिलअखेरला परिपक्व होण्यास सुरुवात होते. गेल्या वर्षी १५ मेनंतर पूर्वपट्ट्यात आंबा तयार झाला होता.
----------
कोट
देवगड हापूसला सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालवी आणि अखेरपर्यंत मोहोरास सुरुवात होणे अपेक्षित असते; परंतु आता नोव्हेंबरअखेरपर्यंत पालवीच फुटते. त्यामुळे हंगाम महिना ते सव्वा महिना लांबण्याची शक्यता आहे.
- तेजस मुळम, कलंबई, देवगड
-----------
कोट
जिल्ह्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे. आज १३ अंशांपर्यंत पारा होता. ही थंडी १३ ते १७ दिवस कायम राहिल्यास त्याचा चांगला परिणाम आंब्यावर होईल. ज्या ठिकाणी पालवी आहे, त्याला मोहोर येईल आणि मोहोर आहे, त्यावरही उत्पादनाच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसून येतील. थंडीत कीडरोगांचे प्रमाणही कमी राहते. मात्र, थंडीचे प्रमाण कायम राहणे आवश्यक आहे.
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, रामेश्वर फळ संशोधन उपकेंद्र, देवगड
----------
दृष्टिक्षेप
* जिल्ह्यात आंबा लागवडीखालील क्षेत्र- ३५ हजार हेक्टर
* उत्पादनक्षम क्षेत्र- २८ हजार हेक्टर
* हापूसचे अधिकतर क्षेत्र- देवगड, मालवण, वेंगुर्ले तालुका