पतंजली योग वर्गाचे ओरोसमध्ये उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतंजली योग वर्गाचे 
ओरोसमध्ये उद्‍घाटन
पतंजली योग वर्गाचे ओरोसमध्ये उद्‍घाटन

पतंजली योग वर्गाचे ओरोसमध्ये उद्‍घाटन

sakal_logo
By

63970
ओरोस ः योग वर्गाचे उद्‍घाटन करताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत. शेजारी शेखर बांदेकर आदी.

पतंजली योग वर्गाचे
ओरोसमध्ये उद्‍घाटन
बांदा ः पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोसच्या संयुक्त विद्यमाने ओरोस शहरामध्ये नुकताच पतंजली योग वर्ग सुरू करण्यात आला. या वर्गाचे उद्‍घाटन ब्रिगेडीयर सुधीर सावंत व कृषी महाविद्यालयचे प्रा. आनंद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी शेखर बांदेकर (पतंजली योगसमिती उपजिल्हा प्रभारी), तुळशीराम रावराणे (पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी) आनंद परब (युवा जिल्हा प्रभारी), विवेक राणे, सैनिक फेडरशनचे जिल्हाध्यक्ष श्री परब, कणकवली तालुका प्रभारी प्रकाश कोचरेकर आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी योग वर्गामध्ये लक्षणीय उपस्थिती होती. सर्व साधकांनी सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायामाचा अभ्यास केला. योग वर्ग सकाळी साडेपाच ते सात या वेळेत दररोज सुरू राहील. रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी नागरिकांनी या योग वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रिगेडीयर सावंत यांनी केले.
.................
63969
मडुरा ः नाबर प्रशाळेतील विजेत्या मुलांसोबत शिक्षक.

मडुऱ्यात भाजी स्पर्धेस प्रतिसाद
बांदा ः मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत आयोजित भाजी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी भाज्यांचे आहारातील महत्त्व व उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध भाजी व त्या रंगांचे कपडे परिधान केले होते. यावेळी घेतलेल्या स्पर्धेत ज्यु. केजी-मिताली साळगावकर, मायरा रॉड्रिग्स, सीनियर केजी-सार्थक वालावलकर, पहिली- कौशल मेस्त्री, सुयश परब, दुसरी-लीजा मारनेकर, तनिष्का महाले, तिसरी-स्टेला फर्नांडिस, तनिषा राऊळ, चौथी- हफसा शेख, यज्ञा वारंग यांनी यश मिळविले. सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रिग्स, तेजस्वी गावडे, प्राची परब आदी उपस्थित होते. तेजस्वी गावडे यांनी सूत्रसंचालन केले. प्राची परब यांनी आभार मानले.
---
सावंतवाडीत स्पर्धांचे आयोजन
सावंतवाडी ः सावंतवाडी पालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण- २०२३ व माझी वसुंधरा, वॉर्ड सौंदर्यीकरण अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. उद्यापासून (ता. २३) विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे. यात चित्रकला, भित्तीचित्र, पथनाट्य, जिंगल, शॉर्टफिल्म(रिल्स), स्वच्छ ईनोव्हेटिव्ह, स्वच्छता चॅम्पियन (पुरुष-स्त्री), आत्मनिर्भर वॉर्ड, स्वच्छ वॉर्ड, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ अपार्टमेंट, स्वच्छ शासकीय कार्यालये, स्वच्छ शाळा, व्यावसायिक कॉम्प्लेक्स, स्वच्छ हॉस्पिटल, कचर्‍यापासून कलाकृती अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे. शहरातील नागरिकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. गतवर्षी पालिकेच्या या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
---------------
सुषमा अंधारे आज सावंतवाडीत
सावंतवाडी ः महाप्रबोधन यात्रेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्या (ता. २३) सावंतवाडी येथे सायंकाळी साडेचारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेला भेट देणार आहेत. अंधारे यांची सावंतवाडीत सभा होणार नाही; मात्र पत्रकार परिषद होणार आहे. कोल्हापूर येथे अंधारे यांनी सावंतवाडीत जाऊन केसरकर यांचा समाचार घेणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे अंधारे यांच्या सावंतवाडी दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
---
बांगडे, तारली मिळतेय जाळ्यात
मालवण ः यंदाच्या मत्स्य हंगामात गेले तीन महिने मालवणातील रापण व्यावसायिकांना समाधानकारक कॅच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही रापणी समुद्रात उतरलेल्या सुद्धा नाहीत. रापणकर मच्छीमार खांडवी म्हणजे थव्याने येणाऱ्या मासळीच्या प्रतीक्षेत आहेत; पण मागील दोन दिवस वायरी, तारकर्ली आणि देवबाग समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात खांडवी मासळी किनाऱ्यालगत सरकत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढत असताना येथील काही रापण व्यावसायिकांच्या जाळ्यात तारली आणि बांगडे मासे बऱ्यापैकी सापडले आहेत. काही रापणींना २० ते २५ खंडीपर्यंत मिळाले.
---------------
मालवण किनारी स्वच्छता मोहीम
मालवण ः मालवण शहर भाजपचे युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर मित्रमंडळातर्फे रविवारी मालवण दांडी ते बंदर किनारपट्टीवर जेटीदरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध सामाजिक संस्था, नागरिक, पर्यावरणप्रेमी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. युथ बिट्स फॉर क्लायमेट, लायन्स क्लब मालवण, जिज्ञासा फाउंडेशन नगरपालिका आरोग्य विभाग, मक्रेश्वर दांडी मित्रमंडळ मक्रेश्वर मित्रमंडळ गवंडीवाडा, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अशा संस्थांचा सहभाग लाभला. या संकल्पनेतून किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न राहतील, असे ताम्हणकर यांनी सांगितले.
...............
कुडाळमध्ये आज ‘वायमन’ची सभा
कुडाळ ः वायमन गॉर्डन कंपनीच्या जिल्ह्यातील कामगारांची तातडीची सभा रविवारी (ता. २७) कुडाळ एमआयडीसी येथील ब्राह्मण मंदिरात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत कामगारांच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत. सभेला सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन कामगार संघटनेचे नेते हरिश्चंद्र केळजी यांनी केले आहे.