तारलीसह बांगड्यांची मोठी ‘कॅच’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारलीसह बांगड्यांची मोठी ‘कॅच’
तारलीसह बांगड्यांची मोठी ‘कॅच’

तारलीसह बांगड्यांची मोठी ‘कॅच’

sakal_logo
By

तारलीसह बांगड्यांची मोठी ‘कॅच’

वायरी किनारा ः पारंपरिक मच्छिमार सुखावला

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : गेल्या दोन-चार दिवसांत येथील किनारपट्टीवर बांगड्याची आवक काहीशी घटली असतानाच वायरी येथील पारंपरिक मच्छिमारांच्या रापणीला तारली आणि बांगडा यांची मोठी ‘कॅच’ मिळाली. त्यामुळे पारंपरिक मच्छिमार काहीसा सुखावला आहे.
यांत्रिक मासेमारीच्या आक्रमणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे विस्कळीत झालेल्या पारंपरिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात मासळी मिळणे कठीण बनले होते. अशातच तारली व बांगड्याची चांगली कॅच मिळाल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येथील वायरी समुद्रकिनारी मच्छिमार समुदायाने त्यांच्या पारंपरिक जाळ्यात तारली आणि बांगडा मासे पकडले. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे म्हणाले, "आम्ही किमान १३ ते १५ टन मासे पकडण्यात यश मिळविले आहे. ही दुर्मिळ घटनांपैकी एक घटना आहे. जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात मासळी मिळाल्याने आम्ही सर्वच आनंदी आहोत." दरम्यान, येथील मासळी स्थानिक बाजारपेठेत विकली जाते; परंतु त्यातील बहुतांश मासळी बेंगळुरू, हुबळी आणि गोवा यांसारख्या ठिकाणी पाठवली जाते. तिथे घाऊक विक्रेते त्याचा साठा करतात आणि नंतर देशाबाहेर निर्यात करतात, अशी माहिती मच्छीमारांनी दिली. गेल्या तीन वर्षांच्या काळात मच्छीमारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. कोरोना काळात फारच वाईट अवस्था होती. आता कुठे दिवस पालटू लागले आहेत. यावर्षीच्या पहिल्याच हंगामात मिळालेल्या चांगल्या मासळीने हंगामाची सुरुवात दमदार झाली आहे; मात्र सारे काही निसर्गाच्या हातात आहे, असे मच्छीमारांनी सांगितले.