पान एक-सासोलीत पोटकालवा काम अडविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-सासोलीत पोटकालवा काम अडविले
पान एक-सासोलीत पोटकालवा काम अडविले

पान एक-सासोलीत पोटकालवा काम अडविले

sakal_logo
By

पान एक

पोटकालव्याचे काम बंद पाडले
---
सासोलीतील शेतकरी संतप्त; भूसंपादन मोबदला आधी देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २२ ः सासोली हेदूस येथे सुरू असलेले पोटकालव्याचे काम स्थानिक शेतकऱ्यांनी बंद पाडले. चार एकच्या नोटिसा आणि भू संपादनाची रक्कम आधी द्या आणि मगच काम करा, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. तिलारी प्रकल्पाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने ठेकेदाराने काम थांबविले.
सासोली हेदूस येथील शाळेच्या परिसरात पाईपद्वारे पोट कालव्याचे पाणी शेतापर्यंत नेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सावंतवाडी येथील ठेकेदार ते काम करीत आहेत. त्या कामावर जवळपास तीस लाख रुपये शासन खर्च घालणार आहे. असे असले तरी ज्या जमिनीतून कालवा जातो, त्या जमिनीचे भूसंपादन करून त्याची भरपाई शेतकऱ्यांना दिलेली नाही. शेतकऱ्यांना चार एकच्या नोटिसाही बजावल्या नाहीत. त्यामुळे सज्जन धाऊसकर व अन्य शेतकऱ्यांनी ते काम रोखले आणि आधी चार एकच्या नोटिसा व भूसंपादनाची रक्कम द्या, मगच काम करा असा पवित्रा घेतला. त्यामुळे तिलारी प्रकल्पाधिकारी तेथे आले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे लेखी पत्राची मागणी केली. आपणास चार-एकची नोटीस देणे आपल्या हातात नाही. मात्र, भूसंपादनाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्न करीन, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली; पण शेतकरी लेखी पत्रावर ठाम राहिल्याने चर्चा यशस्वी होऊ शकली नाही.

बाजारभावाने भरपाई
भूसंपादन प्रक्रिया करण्याची जबाबदारी सिंचन विभागाची होती. त्यांनी २०१२ मध्ये प्रस्ताव केला होता; पण त्यात त्रुटी असल्याने तो परत आला. तो पुन्हा पाठविला नसल्याने भरपाई रखडल्याचे समजते. दुसरीकडे आता जर प्रस्ताव केला तर खासगी वाटाघाटीचा होईल. त्यामुळे झाड झडोरा आणि जमिनीची रक्कम बाजारभावाने शेतकऱ्यांचे मत लक्षात घेऊन दिली जाईल. त्यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा अपेक्षित आहे.