रिफायनरीबाबत एक पाऊल पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिफायनरीबाबत एक पाऊल पुढे
रिफायनरीबाबत एक पाऊल पुढे

रिफायनरीबाबत एक पाऊल पुढे

sakal_logo
By

६४१०३

रिफायनरीसाठी एक पाऊल पुढे
मंत्री उदय सामंत; राजन साळवींची भूमिका सकारात्मक
रत्नागिरी, ता. २२ : बारसू (ता. राजापूर) येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत आज मुंबईत सकारात्मक चर्चा झाली. ६ हजार २०० एकरवर हा प्रकल्प होणार आहे. जमीन मालकांपैकी २ हजार ९०० जणांनी संमतीपत्र दिली आहेत. भूसंपादन आणि तेथे कूपनलिका घेण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाला लागणारे पाणी अर्जुना किंवा जामदा धरणातून न घेता कोयनेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३ हजार जणांना थेट रोजगार, तर ७५ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पॅकेज पुढच्या बैठकीत देण्याचा प्रयत्न आहे. टोकाचे पाऊल उचलून काही साध्य होणार नाही. अरेरावीची भाषा करून चारणार नाही. सामंजस्याने मार्ग काढल्यास विकासात्मक क्रांती घडविणारा हा प्रकल्प आहे, असे स्पष्ट मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
रिफायनरीसंदर्भात खासदार विनायक राऊत, राजापूर आमदार राजन साळवी, काही स्थानिकांची एकत्रित बैठक मंगळवारी उद्योगमंत्री सामंत यांच्याबरोबर मुंबईत झाली.
सामंत म्हणाले, ‘‘बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यासाठी भूसंपादन सुरू होते. आज स्थानिक खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्याशी चर्चा होती. राऊत यांनी उपस्थित राहणार नसल्याचे पत्र देऊन स्थानिकांच्या भूमिकेला पाठिंबा आहे, परंतु जबरदस्तीने प्रकल्प लादू नयेत, असे कळविले आहे. पुढच्या टप्प्यात समर्थन आणि समर्थन न करणाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. आजच्या बैठकीला आमदार राजन साळवी उपस्थित होते. साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा देणारे पत्र दिले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाला पत्र देऊन बारसूत १३००० एकर जागा मिळेल, असे कळविले होते; मात्र त्याला विरोध करणारी देवाचे गोठणे आणि शिवने ही गावे रिफायनरीमध्ये येणार नाहीत. प्रकल्पासाठी ६ हजार २०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी २ हजार ९०० एकची संमतीपत्र मिळाली आहेत. नाटे येथे क्रुड ऑईलचे सेंटर होणार आहेत. तेथे कूपनलिका मारण्याचे काम सुरू झाले आहे. एकूण २ लाख कोटींची उलाढाल असलेला हा प्रकल्प आहे. बांधकाम, थेट रोजगार आणि अप्रत्यक्ष रोजगार असा सुमारे लाखभराना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे.’’


राजन साळवींना धन्यवाद
प्रकल्पास समर्थन देणाऱ्या आमदार राजन साळवींना मी त्यांना धन्यवाद देतो. स्थानिकांवर अन्याय होणार नाही, दबाव टाकणार नाही. साळवीबरोबर आता जनतेनेही या प्रकल्पाचे समर्थन करावे. राजकीय रंग देऊ नये. राजन साळवींनी चांगली भूमिका घेतली तीच शासनाची भूमिका आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

राऊत यांची डावपेचाची भाषा
अनेक लोक अजूनही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत; परंतु आजची पत्रकार परिषद रिफायनरीबाबत आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करणे योग्य नाही. दोन महिन्यांत सरकार पडेल, असे संजय राऊत यांचे वक्तव्य असले तरी ही त्यांची डावपेचाची भाषा आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

दृष्टिक्षेपात
२ हजार ९०० जणांनी संमतीपत्रे
आवश्यक पाणी कोयनेतूनच
३ हजार जणांना थेट रोजगार
७५,००० जणांना अप्रत्यक्ष रोजगार


काय, काय करणार
पाईपलाईन जाईल त्या गावाला टॅंक
सर्वोत्म दर्जाचे स्किल डेव्हलपमेंट युनिट
कोकणातील दर्जेदार झाडे लावणार
जुने हॉस्पिटल कंपनीने सुरू करून द्यावे