मीटर बंद असूनही भरमसाट बिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीटर बंद असूनही भरमसाट बिले
मीटर बंद असूनही भरमसाट बिले

मीटर बंद असूनही भरमसाट बिले

sakal_logo
By

53394
मीटर बंद असूनही भरमसाट बिले

नंदन वेंगुर्लेकर ः महावितरणवर मनमानीचा आरोप, व्यापारी संघाने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या पुढाकाराने महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ ग्राहक मेळावे झाले. या मेळाव्यातून सुमारे १८ ते १९ हजार वीज मीटर बंद असून वीज मंडळ मात्र मनमानीप्रमाणे वीज बिल आकारात असल्याचे समोर आले आहे, असे जिल्हा व्यापारी संघाचे कार्यकारणी सदस्य नंदन वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे.
वेंगुर्लेकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महावितरण कंपनीकडे आग्रह धरून ९ ग्राहक मेळावे आतापर्यंत झाले आहेत. आता देवगड येथे दहावा मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील ग्राहकांबाबत महावितरण कंपनीचा मनमानीपणा समोर आला आहे. सुमारे १८ ते १९ हजार वीज मीटर बंद आहेत. या ठिकाणी अंदाजे वीजबिले आकारण्याचा मनमानी कारभार महावितरणचा सुरू आहे. बांदा शहर, सावंतवाडी शहर आणि अनेक घरावरून विज लाईन गेल्या आहेत. अनेक गावांमध्ये वीजेचे खांबही मनमानीपणे घराजवळच ठेवले आहेत. या महावितरणच्या मनमानीबाबत ग्राहकांनी तक्रारी मांडल्या आहेत. रीडिंग शिवाय ऍव्हरेजनुसार बिल आकारण्याचा प्रताप काही वर्षांपासून महावितरण कंपनी करत असून ग्राहकांची ही लूट असल्याचेही ग्राहकांनी सांगितले. काही भागांमध्ये वीज बिल तारीख संपल्यानंतर किंवा वीज बिल भरण्याच्या तारखेच्या तोंडावर दिले जाते. त्यामुळे दंडात्मक भुर्दंड वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. हा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मनमानीपणा ग्राहकांनी समोर आणला आहे.
महावितरणच्या जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारींची फाईल कंपनीच्या प्रकाशगड येथील कार्यालयाकडे नेऊन तेथे त्यांच्या अडचणी व समस्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरनंतर महावितरणच्या प्रकाशगड येथील कार्यालयात व्यापारी संघाचे पदाधिकारी जातील. महावितरणची ग्राहकांच्या बाबतीत मोनोपॉलीसी झाली आहे. त्याबाबत जिल्हा व्यापारी संघाने आवाज उठवण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील ग्राहक भरडला जाऊ नये, याची खबरदारी घेण्याचा विचारही व्यापारी संघाचा आहे. जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या हितासाठीच लढत असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
-----------
चौकट
सीमेलगत गोव्यातून विजेची मागणी
दोडामार्ग, सासोली, बांदा, मडुरा, सावंतवाडी, शिरोडा अशा गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या भागातील ग्राहकांनी वीजबिले गोव्यातील मिळावी, अशी मागणी केली. गोव्यामध्ये वीज दर कमी असून वीज वितरण योग्य पद्धतीने चालले आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आल्याचे वेंगुर्लेकर यांनी सांगितले.
-----------
चौकट
तक्रारींचा पाठपुरावा करणार
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील वीज वितरण ग्राहकांचे मेळावे संपल्यानंतर माहिती घेऊन महावितरण कंपनीकडे ग्राहकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन काय पूर्तता झाली? त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ पाठपुरावा करणार आहे. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या कार्यकारणीची बैठक होईल तसेच जिल्हा व्यापारी संघ यापुढेही तालुकानिहाय वीज ग्राहकांचे प्रबोधन करून वीज वितरण कंपनीचा मनमानीपणा थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील वेंगुर्लेकर यांनी सांगितले.