सेंट्रल इंग्लिश स्कूलचे व्हॉलीबॉल स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे
व्हॉलीबॉल स्पर्धेत यश
सेंट्रल इंग्लिश स्कूलचे व्हॉलीबॉल स्पर्धेत यश

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे व्हॉलीबॉल स्पर्धेत यश

sakal_logo
By

६४२०१
सावंतवाडी : विजेत्या संघासोबत मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ आदी.

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे
व्हॉलीबॉल स्पर्धेत यश
सावंतवाडी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा खेमराज विद्यालय बांदा येथे आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने विजेतेपद पटकावले. प्रशालेचे विद्यार्थी झोहेर बेग (कर्णधार), अब्दुललतिफ पटेल, अकबरअली खान, सफवान बांगी, मोहम्मद फैज शेख, अलियान मुजावर, मुस्तकीम सय्यद यांनी तालुकास्तरावर यश मिळवून जिल्हास्तरावर धडक मारली. विजेत्या संघाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, क्रीडा शिक्षिका मारिया आल्मेडा यांचे मार्गदर्शन मिळाले. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मालवण तालुक्यातील पोईप येथे होणार आहे. या यशाबाबत सावंतवाडी मर्कझी जमात मुंबई संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका हेशागोळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
.................
६४२०२
सावंतवाडी ः ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत करताना मान्यवर.

ज्ञानेश्वर म्हात्रेंचे सावंतवाडीत स्वागत
तळेरे ः विधान परिषद शिक्षक मतदारसंघ कोकण विभागाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील शाळांना भेट दिल्या. सावंतवाडी येथे तसेच प्रत्येक शाळेत त्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि भेडसावणाऱ्या समस्यांची जाण त्याच क्षेत्रातल्या व्यक्तीला माहीत असतात. आपण हजारो शिक्षकांचे प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन सोडविले आहेत. प्रसंगी २५० पेक्षा जास्त आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकारांसाठी आपल्याला विधान परिषदेत निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
---
स्पर्धा परीक्षांबाबत डिसेंबरमध्ये व्याख्याने
कणकवली ः ‘तिमिरातून तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते सीमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांची २ ते ४ डिसेंबर दरम्यान देवगड, मालवण, कणकवली तालुक्यात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शपर व्याख्याने होणार आहेत. २ डिसेंबरला सकाळी साडेआठला देवगड तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगाव, दुपारी दोनला महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार, ३ डिसेंबरला सकाळी नऊला पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव, दुपारी एकला कणकवली तालुक्यातील इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅंड आर्टस कळसुली, तर ४ ला ९ वाजता मालवण तालुक्यातील आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे येथे व्याख्यान होईल.
---
बालकासाठी बिद्रे यांचे प्लेटलेट्स
सावंतवाडी ः येथील संजीवनी बालरुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाच दिवसांच्या बालकास ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेट्सची तातडीने गरज होती. येथील पंकज बिद्रे यांनी ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट्स दान केले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. पाच दिवसांच्या बाळाला जीवनदान दिल्याबद्दल बिद्रे व सूर्याजी यांचे बालकाचे वडील सिध्देश नाईक यांनी आभार मानले. यासाठी भाजप जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक यांचेही सहकार्य मिळाले.
--
डामरे येथे अनभवानी मंदिरात जत्रोत्सव
कणकवली ः डामरे (ता.कणकवली) येथील अनभवानी मंदिरांमध्ये वार्षिक जत्रोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्येला अर्थात २४ नोव्हेंबरला हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
-----
कणकवलीत ऑनलाईन मार्गदर्शन
कणकवली ः तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी ग्रामपंचायतसाठी उमेदवारी भरण्याची ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता.२४) सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.