साहित्यिकांवरील ‘जीएसटी’ रद्द व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यिकांवरील ‘जीएसटी’ रद्द व्हावा
साहित्यिकांवरील ‘जीएसटी’ रद्द व्हावा

साहित्यिकांवरील ‘जीएसटी’ रद्द व्हावा

sakal_logo
By

64250
मालवण ः बॅ. नाथ पै सेवांगण येथे साहित्यिकांचा गप्पाटप्पा कार्यक्रम पार पडला.

साहित्यिकांवरील ‘जीएसटी’ रद्द व्हावा

महावीर जोंधळे ः मालवण सेवांगणमध्ये रंगल्या ‘गप्पाटप्पा’

मालवण, ता. २३ : पुस्तकांच्या कागदाच्या किंमती बेफाम वाढल्या आहेत. कागदावर व साहित्यिकांच्या मानधनावर द्यावा लागणारा जीएसटी रद्द होणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्वस्त पुस्तके मिळणे कठीण आहे. याकरिता वाचकांनीच मागणी करायला हवी, असे मत ख्यातनाम साहित्यिक महावीर जोंधळे यांनी येथे व्यक्त केले.
बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये मान्यवर साहित्यिकांबरोबर ‘गप्पाटप्पा’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास इंदुमती जोंधळे, दीपा देशमुख, अरुणा सबाने आणि मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर सहभागी झाले होते. सुरुवातीला सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रमुख कार्यक्रमात प्रत्येकाने आपली ओळख तसेच करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
जोंधळे म्हणाले की, आपणास शाळेत शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याने वाचनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर घरात असणारे सेवादलचे वातावरण, घरी येणारे सर्व व्यासंगी साहित्यिक यांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडत गेला. यातूनच वाचनाची आवड वाढून पुढे लिखाण करू लागले. आजवर त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंदुमती जोंधळे यांचे बालपण अनाथ आश्रमात गेले. विवाहानंतर महावीर जोंधळे यांच्या एकत्रित कुटुंबात सुरुवातीला स्थिरावणे खूप कठीण होते; परंतु त्यांनी सर्वांशी समरस होऊन कुटुंबात मानाचे स्थान मिळविले. आयुष्यातील हे सर्व त्यांनी लिहावे, यासाठी सर्वांनी आग्रह धरला. शेवटी त्यांचे ‘बिनपटाची चौकट’ हे अनुभवांचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या आजवर दहा आवृत्या निघाल्या आहेत. यानंतर इंदुताईंची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. आपणास घडविण्यात आपल्या पतीचा फार मोठा वाटा असल्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात. अरुणा सबाने या नागपूरच्या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका म्हणून आज प्रसिध्द आहेत. त्यांचे बालपण एका मोठ्या कुटुंबात गेले. घरात आठ भावंडे. लहानपणापासून एकत्रित वाचन करणे हा भावंडांचा एक खेळ असायचा. यातूनच पुढे त्यांना वाचनाची आवड लागली. त्यांनी लहानपणीच ‘मृत्युंजय’, ‘ययाति’ आदी पुस्तके वाचून काढली. लहानपणापासून त्या छोट्या-मोठ्या कविता करत. त्यांच्या काही कविता आकाशवाणीवरूनही प्रसिद्ध झाल्या होत्या. सामाजिक कार्यात संघर्ष करताना अनेक कथांची बीजे सापडली. त्यातून अनेक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली.
दीपा देशमुख एक सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणापासून अबोल असणाऱ्या दीपाताईंना आपण भविष्यात लेखिका होऊ असे वाटले नव्हते. एका चांगल्या सुखवस्तू कुटुंबामध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांनतर शिक्षण घेता घेता समाजातील इतर घटकांवर लक्ष केंद्रित केले. सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी आदिवासी पाड्यामध्ये राहून केली. एकट्याने ग्रामीण भागात राहून तिथल्या सामाजिक, कौटुंबिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यातूनच त्यांना मानवतेचा धर्म लक्षात आला. यातूनच घडलो, असे त्या ठामपणे सांगतात. त्यांनी सर्व प्रथम डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, अच्युत गोडबोले आणि डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या कार्यावरची सहा पुस्तके लिहिली. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नंतर अच्युत गोडबोले यांच्यासोबत अनेक पुस्तकांचे सहलेखनही केले.
मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी आजपर्यंत सुमारे बाराशे पुस्तकांचे प्रकाशन गेले. आज वाचक वर्ग कमी असला तरी तो चोखंदळ आहे. त्यांच्यापर्यंत पुस्तक पोहोचणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो, मीना घुर्ये आणि सेवांगणचे कर्मचारी उपस्थित होते. मनोजकुमार गिरकर यांनी आभार मानले.