मधुमका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमका
मधुमका

मधुमका

sakal_logo
By

55607
--
64204
डॉ. विलास सावंत


मधुमका
मका हे आपल्या आहारात अन्नधान्य, पशुखाद्य आणि औषधी क्षेत्रात बहुपयोगी अशा तीन प्रकारे उपयोगी पडते. ‘मधुमका’ या प्रकारातील मक्याची कणसे ही अधिक गोड आणि स्वादिष्ट आहेत. या मक्याच्या दाण्यांमध्ये साखरेचे प्रमाण १३ ते १५ टक्के असते. हा मधुमका दुधाळ अवस्थेत काढून भाजून किंवा उकडून खाण्यासाठी वापरतात. त्यापासून कॉर्नसूप, कटलेट, वडा, उपमा, भजी, खीर, दाण्याची उसळ, स्वीटकॉर्न, हलवा आदी खाद्यपदार्थ बनविता येतात. मधुमका जातीपरत्वे ९० ते १०० दिवसांत तयार होतो. त्यामुळे कणसे काढून झाल्यानंतर सकस अशी हिरवी वैरण दुभत्या जनावरांसाठी उपलब्ध होईल. या पिकाची भुईमुगामध्ये आंतरपीक म्हणून लागवड केल्यास जास्त फायदेशीर होईल.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
................
मका हे पीक उष्ण हवामानास चांगला प्रतिसाद देते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी २० ते ३२ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. रात्रीचे तापमान जास्त काळ १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास मक्याच्या वाढीवर परिणाम होतो. तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास मका बियाण्याच्या उगवण क्षमतेवर अनिष्ट परिणाम होऊन उगवण नीट होत नाही. लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी किंवा जांभ्या दगडापासून तयार झालेली सुपीक जमीन योग्य आहे. जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. चोपण किंवा जास्त दलदलीच्या जमिनीत मक्याचे पीक घेऊ नये. खरीप भाताची कापणी झाल्यावर जमिनीची नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे. त्यानंतर पिकास पाणी देण्यासाठी वाफे तयार करावेत. रब्बी हंगामात नोव्हेंबरमध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी टोकण पद्धतीने जमिनीच्या मगदुरानुसार ६० से.मी. x २० से.मी. अंतरावर करावी. एका ठिकाणी दोन दाणे सुमारे ४-५ से.मी. खोलीवर पेरावे. उगवणीनंतर १०-१२ दिवसांनी विरळणी करून प्रत्येक ठिकाणी निरोगी, जोमदार असे एक रोप ठेवावे. पेरणीसाठी ८-१० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया ३ ग्रॅम कॅप्टॉन प्रति किलो बियाणे याप्रमाणे करावी. त्यानंतर २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास अँझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक चोळावे. त्यामुळे उत्पादनात ५ ते १० टक्के वाढ होते.
मधुमक्याची ‘शुगर ७५’ ही जात कोकणातील हवामानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. ‘सुमधुर’ आणि ‘अतिमधुर’ या जाती भुईमूगामध्ये आंतरपीक म्हणून घेण्यास योग्य आहेत. याशिवाय माधुरी, सचरेता या जातीही चांगल्या आहेत. मधुमका पिकास हेक्टरी १० टन शेणखत पेरणीपूर्वी कुळवाच्या सहाय्याने जमिनीत मिसळून घ्यावे. याशिवाय प्रति हेक्टरी २०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश या खताची मात्रा द्यावी. यापैकी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी ओळीमध्ये ७-८ सें.मी. खोलीवर द्यावे. उरलेली नत्राची मात्रा पेरणीनंतर ३० आणि ६० दिवसांनी समान विभागून द्यावी. मधुमक्याचे पीक उगवून आल्यानंतर १०-१२ दिवसांनी विरळणी करून प्रत्येक ठिकाणी जोमदार असे एकच रोप ठेवावे. पेरणीनंतर २० आणि ४० दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे. या पिकास १०-१२ दिवसांच्या अंतराने सुमारे ६-८ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकामध्ये जास्त काळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कणसे दुधाळ अवस्थेत असताना कणसांची काढणी करावी. फक्त तयार कणसे काढून घ्यावीत. अशा प्रकारे २-३ वेळा काढणी करावी. नंतर उरलेले मधुमक्याचे पीक दुभत्या जनावरासाठी हिरवा चारा म्हणून वापरावे. हेक्टरी १५० ते १६० क्विंटल कणसाचे उत्पादन मिळते.