गुहागर ः सध्याचा विकास आराखडा जनतेला भरडणारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः सध्याचा विकास आराखडा जनतेला भरडणारा
गुहागर ः सध्याचा विकास आराखडा जनतेला भरडणारा

गुहागर ः सध्याचा विकास आराखडा जनतेला भरडणारा

sakal_logo
By

64297

गुहागरचा विकास आराखडा जनतेला भरडणारा
नगराध्यक्ष राजेश बेंडल; नगरपंचायतीच्या सूचनांप्रमाणे बदल करून आराखडा प्रसिद्ध करणार
मयूरेश पाटणकर ः सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २३ ः जनतेचे जीवन सुरळीत करण्यासाठी उभारलेल्या शासन यंत्रणेची जागा सुरक्षित ठेवून सामान्य जनतेला भरडून विकास आराखडा तयार होत असेल तर तो का स्वीकारायचा, असा प्रश्न उपस्थित करत नगरपंचायत आवश्यक त्या बदलांची माहिती नगर रचनाकारांना देईल आणि बदल केलेला आराखडा प्रसिद्ध करेल, अशी भूमिका नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी विशेष सर्वसाधारण सभेत मांडली. गुहागरचा विकास आराखडा समजून घेण्यासाठी गुहागर नगरपंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा आज बोलावली होती.
नगराध्यक्ष बेंडल म्हणाले, ‘‘३० मीटर रुंदीचा सागरी महामार्ग शहरातील मूळ रस्ता वगळून मधोमध घेतला आहे. एका बाजूला सीआरझेडच्या मर्यादा, दुसऱ्या बाजूला डोंगर त्यातच शहरामधून जाणाऱ्या महामार्गामुळे शहराचे निवासी क्षेत्र आणि हरितपट्टा कमी होत आहे. मुळात कोकणातील जनतेच्या मालकीची तुटपुंजी जमीन आहे तीदेखील वडिलोपार्जित असल्याने एक-दोन गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र प्रत्येकाला मिळते. त्यातच पुन्हा आरक्षणे, रस्ते आणि महामार्ग आले तर लोकांना घरे बांधण्यासाठी जागाच उरणार नाहीत. या विकास आराखड्यात समुद्रालगत असलेले वनविभाग, बंदरविभागाचे क्षेत्रच दाखवलेले नाही. ही जागा शासनाने सागरी महामार्गासाठी घेतली तर खऱ्या अर्थाने पर्यटन वाढेल; पण शासनाच्या जागा विकासासाठी घेतल्या गेल्या नाहीत. म्हणजे जनतेचे जीवन सुरळीत करण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेची जागा सुरक्षित ठेवून सामान्य जनतेला भरडून विकास आराखडा तयार होत असेल तर तो आम्ही का स्वीकारायचा. आम्हाला कोणाचेही नुकसान न होता विकास हवा आहे. त्यामुळे या आराखड्यावर विचार करून नगरपंचायत नगररचनाकार विभागाला काही बदल करण्याची विनंती करेल आणि ते बदल झालेला आराखडा जनतेसमोर ठेवेल.’’
माजी उपनगराध्यक्षा स्नेहा भागडे, स्वच्छता व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रसाद बोले, माजी बांधकाम सभापती माधव साटले यांनीही सध्या लागवडीखाली असलेल्या शेतांमधील आरक्षणाला, अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीला विरोध केला. सागरी महामार्ग हा प्रस्तावित आहे, त्यामुळे पूर्वी प्रसिद्ध झालेल्या सद्यःस्थितीतील जमीन वापराच्या नकाशामध्ये तो दाखवलेला नाही. या प्रस्तावित महामार्गाचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.


आवश्यक बदल सुचवावेत
पर्यटन उद्योगाच्या विकासाला गती देण्यासाठी विकास आराखडा आवश्यक आहे. यात लोकप्रतिनिधींची भूमिकाच महत्त्वाची आहे. विकास आराखड्याचा अभ्यास करून आवश्यक बदलांबाबत थेट नगररचनाकारांशी चर्चा करावी. नगरपंचायतीने ही प्रक्रिया पूर्ण करून विहित मुदतीमध्ये विकास आराखडा जनतेसाठी प्रसिद्ध करावा, अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केली. पुन्हा एकदा विकास आराखड्याचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदल सुचवावेत. त्याची माहिती नगर रचनाकारांना देऊन बदल केलेला आराखडा प्रसिद्ध करण्याचा निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत झाला.

या मुद्द्यावर विरोध
सीआरझेडमुळे पश्चिमेकडे बांधकामाच्या मर्यादा
पूर्वेकडे हरितपट्टा नमूद केल्याने बांधकाम बंदी
शहरातील शेतजमिनीतून जाणार सागरी महामार्ग
शहरांतर्गत रस्ते १२ मीटर रुंदीचे
निवासी क्षेत्राला मिळणारी जागा अपुरी