मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाला दहा महिन्यांच्या दिरंगाईनंतर मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाला दहा महिन्यांच्या दिरंगाईनंतर मुहूर्त
मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाला दहा महिन्यांच्या दिरंगाईनंतर मुहूर्त

मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाला दहा महिन्यांच्या दिरंगाईनंतर मुहूर्त

sakal_logo
By

rat२४p१.jpg
६४३४७
रत्नागिरीः रखडलेल्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला अखेर ठेकेदाराने सुरवात केली.
---------------
मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाला मुहूर्त
पत्तन विभागाच्या पाठपुरावा; आंदोलनाला यश, दर्जेदार कामाची अपेक्षा
रत्नागिरी, ता. २४ः अखेर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून हे काम रखडले होते. पत्तन विभागाचा पाठपुरावा आणि स्थानिकांनी केलेल्या उपोषणाला यश आले आहे. ठेकेदाराने काम सुरू केले आहे. दिरंगाई केल्याबद्दल पत्तन विभागाने दोनवेळा या ठेकेदाराला दंड केला आहे. आता हे काम वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर मिऱ्या बंधाऱ्याचे काम करण्यात येणार आहे. तेथील गावांचे संरक्षण आणि पर्यटन या उद्देशाने या बंधाऱ्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. डिसेंबर २०२१ ला मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम झाले नाही. ठेकेदाराने केवळ दगड आणून किनाऱ्यावर टाकले होते. १० महिन्यामध्ये मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्यासाठी पत्तन विभाग सातत्याने पाठपुरावा करत होता. त्यानंतर पत्तन विभागाने ठेकेदार कंपनीत डीव्हीपी इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ला कामात दिरंगाई केल्याबद्दल पहिल्यांदा १८ लाख ८० हजाराचा दंड केला. त्यानंतर कंपनीला काम सुरू करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीतही काम सुरू न केल्याने पत्तन विभागाने दुसऱ्यांदा कंपनीला १८ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला. एकूण ३६ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर ठेकेदार कामाकडे दुर्लक्ष करत होता. अखेर आप्पा वांदकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम सुरू व्हावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. तेव्हा पत्तन विभागाने लेखी स्वरूपात आठ ते दहा दिवसांमध्ये काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
-----
चौकट
घरांना संरक्षण हवेच
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा येथील गावांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. दरवर्षी पावसामुळे समुद्राचे पाणी मिऱ्या परिसरातील घरांमध्ये शिरते. त्यामुळे मिऱ्या परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात आणि उधाणावेळी ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते. लवकरात लवकर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होऊन त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. स्थानिक आमदार, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नाने या कामासाठी १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मंजूर झालेल्या निधी वेळेत खर्ची पडून दर्जेदार बंधारा व्हावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.