प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

sakal_logo
By

rat24p23.jpg-
64452
चंद्रशेखर बावनकुळे
-----------
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कोणता कानमंत्र देणार?
आज रत्नागिरीत; भाजपच्या व्यूहरचनेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघही
रत्नागिरी, ता. २४ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर येत असून संघटना मजबूत करण्याकरिता ते पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्यांना भेटणार आहेत.आमदार बावनकुळे यांनी रत्नागिरीत भाजपला आक्रमक मार्गक्रमणाचा सल्ला यापूर्वी दिला होता. शुक्रवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कोणता संदेश देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे शहरात सर्वत्र त्यांच्या स्वागताचे फलक झळकले आहेत. आगामी निवडणुकांत शत प्रतिशत भाजप करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील विविध समस्या, नवनवीन उद्योग आणणे यांसह विविध मागण्यांबाबत भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आमदार बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
अॅड. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्याचे नियोजन केले आहे. प्रदेशाध्यक्षांसह भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील हेसुद्धा रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. संघटनेचे उच्च पदाधिकारी येत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरात भाजपचे झेंडे व सर्वत्र फलक लागल्यामुळे वातावरण भाजपमय झाले आहे.
आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याकरिता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील. गेली दहा वर्षे भाजपला यश मिळाले नसले तरी अॅड. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला विजयरथ पुढे नेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या टीप्स महत्त्वाच्या ठरणार आहेत. 2024 च्या लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रात आक्रमक व्यूहरचना करण्यास सुरवात केली आहे. त्यातील एक मतदार संघ रत्नागिरी-सिंधुदुर्गही समोर ठेवण्यात आला आहे. आमदार बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यापूर्वी त्यांच्याकडे भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेचे संयोजकत्व होते. त्यावेळी आमदार बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी सुरू आहे.
-------------
चौकट
आक्रमक नेत्या वाघ रत्नागिरी
भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष व आक्रमक महिला नेत्या म्हणून राज्यभर परिचित असलेल्या चित्रा वाघ याही रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. महिला पदाधिकाऱ्यांना त्या मार्गदर्शन करणार असून पक्षवाढीसाठी त्या कानमंत्र देतील.