पान एक-देवगड हापूसची पहिली पेटी रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-देवगड हापूसची पहिली पेटी रवाना
पान एक-देवगड हापूसची पहिली पेटी रवाना

पान एक-देवगड हापूसची पहिली पेटी रवाना

sakal_logo
By

64485
64486
पान एक


देवगड हापूसची पहिली पेटी रवाना
कातवणला मान; दिनेश, प्रशांत शिंदे बंधूंच्या मेहनतीला मिळाले फळ
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः अनेक अडचणींवर मात करीत आणि प्रचंड मेहनत घेत तयार झालेला जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस’ आंबा आज वाशी फळबाजारात रवाना झाला. तालुक्यातील कातवण येथील दिनेश दीपक शिंदे आणि प्रशांत सीताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसची दोन डझनची या हंगामाची पहिली पेटी आजच्या मुहूर्तावर फळबाजारात पाठवली. ऐन नोव्हेंबरमध्येच हापूसने मुंबई बाजार गाठल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक होत आहे. दरम्यान, हंगामाच्या आधीच बाजारात जाणाऱ्या दोन डझनच्या आंबा पेटीला सुमारे सात ते आठ हजारांच्या आसपास भाव मिळेल, असा अंदाज स्थानिक शेतकरी व्यक्त करीत होते.
पहिली आंबा पेटी फळबाजारात रवाना झाल्याने यंदाच्या आंबा हंगामाची चाहूल लागली आहे. पावसामध्ये आंबा कलमांचे खत व्यवस्थापन झाल्यानंतर साधारणपणे पाऊस गेल्यानंतर थंडीच्या सुरुवातीला झाडांना पालवी येते. पालवी परिपक्व झाल्यानंतर मोहोराची चाहूल लागते. झाडाला आलेला मोहोर टिकवून त्यातून उत्तम फलधारणा होण्यासाठी बागायतदार फवारणी करतात. त्यानंतर फलधारणा होऊन आंबा पीक बाजारात जाते, असे सर्वसाधारण व्यवस्थापन चालते; मात्र अलीकडे शेतकरी निसर्गालाही आपल्या साथीला घेतात. काहीवेळा पावसात झाडांना मोहोर आल्यास आलेला मोहोर टिकवून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. यातून हंगामाआधी आंबा पीक घेता येते. हेच तंत्र तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आत्मसात केले. त्यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना सुमारे १५ ऑगस्टच्या आसपास मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे काही कलमांवरील आलेला मोहोर गळून पडला; मात्र चार-पाच कलमावरील मोहोर तसाच राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रयोग म्हणून आलेला मोहोर टिकवण्यासाठी शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. मोहोराची काळजी घेतल्याने त्यातून उत्तम फलधारणा झाली. त्यामुळेच चार कलमावरील उत्पादित झालेल्या आंब्याचे पहिले फळ काढून ‘देवगड हापूस’ची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मुहूर्त केला. विधिवत पूजा करून पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली. पेटी रवाना होताना आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे, नरेश डामरी, पप्पू लाड आदी उपस्थित होते.

चौकट
दराची अपेक्षा
हंगामाच्या आधीच फळबाजारात जाणाऱ्या दोन डझनच्या आंबा पेटीला सुमारे सात ते आठ हजारांच्या आसपास भाव मिळेल, असा अंदाज स्थानिक शेतकरी व्यक्त करीत होते. हापूस कलमांची योग्य निगा राखल्यास फलधारणा होऊ शकते, असे यातून ध्वनीत झाले. ऋतुचक्रात वारंवार बदल होत असून, शिंदे बंधूंनी मोहोर टिकविण्यासाठी अथक प्रयत्न केले. यंदाच्या हंगामातील आंबा फळाची चव त्यांनी स्वतः चाखली. त्यानंतरच उर्वरित आंबे काढत पेटी आज मार्गस्थ केली आहे.


कोट
बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन काहीवेळा अडचणीत सापडते, तरीही कलम बागांची योग्य मशागत केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नसते. यासाठी सुयोग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. ऑगस्टमध्ये कलमांना आलेला मोहोर टिकवून त्यातून तयार झालेला आंबा आता फळबाजारात पाठवण्यात येत आहे. पहिल्या आंबा पेटीचा आज प्रारंभ झाला. वाशी फळबाजारातील आंबा व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे आंबा पेटी रवाना केली. पहिल्या पेटीला चांगला भाव मिळेल, असा विश्‍वास आहे.
- प्रशांत शिंदे, आंबा बागायतदार, कातवण