‘महाआवास’मध्ये मुणगेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाआवास’मध्ये मुणगेचे यश
‘महाआवास’मध्ये मुणगेचे यश

‘महाआवास’मध्ये मुणगेचे यश

sakal_logo
By

64615
मुंबई ः येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगड पंचायत समितीच्यावतीने गौरव स्विकारण्यात आला.

‘महाआवास’मध्ये मुणगेचे यश

सर्वोत्कृष्ट गृह संकुल; कातकरी समाजासाठी वसाहत, शासनाकडून मुंबईत गौरव

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य पातळीवर मुणगे (ता.देवगड) ग्रामपंचायतीचा महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट गृह संकुल’ म्हणून तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुणगे गावात कातकरी समाजासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण घरकुल वसाहतीनिमित्त हा गौरव झाला. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील पंचायत समिती प्रशासनाने पुरस्कार स्विकारला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राज्य पातळीवर विविध स्तरावरील कामकाजाचा गौरव करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या खास कार्यक्रमावेळी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृह निर्माण) संचालक डॉ. राजाराम दिघे, अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) राजेश कुमार आदी उपस्थित होते.
तालुक्यात कातकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी येथील पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत विभागाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतुन मोंड, सौंदाळे, वळीवंडे, शिरगांव, मुणगे आदी गावात कातकरी समाज बांधवाना घरे बांधून देण्यात आली आहेत. यातील मुणगे येथील कातकरी वस्तीसाठी बांधण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण घरकुलासाठी राज्यस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट गृह संकुल’ म्हणून तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. येथील प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, देवगडचे तत्कालीन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) नीलेश जगताप, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) अंकुश जंगले यांनी पुरस्कार स्विकारला. सर्वोत्कृष्ट गृह संकुल विभागामध्ये खरेखार्दुणे ग्रामपंचायत (अहमदनगर) प्रथम, अदासी ग्रामपंचायत (गोंदिया) द्वितीय तर मुणगे (ता.देवगड) ग्रामपंचायत तृतीय आली. महा आवास अभियानमध्ये विभाग स्तरावर कोकण विभाग अव्वल ठरला. सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये अनुक्रमे गोंदिया, धुळे, ठाणे तर सर्वोत्कृष्ट तालुक्यांमध्ये अनुक्रमे गोरेगाव (गोंदिया), गगनबावडा (कोल्हापूर), अकोले (अहमदनगर) पहिले तीन आले.
........................
चौकट
अणाव ग्रामपंचायत द्वितीय
सिंधुदुर्गातील अणाव ग्रामपंचायतीचा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून द्वितीय क्रमांकाने सन्मान झाला. यामध्ये अंबावडे (भोर, पुणे) ग्रामपंचायत प्रथम तर बोरगाव (ब्रह्मपूरी, चंद्रपूर) ग्रामपंचायत तृतीय आली.
.......................
कोट
महा आवास अभियानतंर्गत तालुक्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजनेअंतर्गतही चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे घरकुलांना रोजगार हमी, जलजीवन मिशन, उज्वला गॅस योजना, महाऊर्जा अशा विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला आहे. या अभियानाचा भाग म्हणजे नमुना (डेमो हाऊस) बांधकाम करण्यासारखे लाभार्थीमुख उपक्रम प्राधान्याने पुर्ण करण्यात यश आले आहे. मुणगे येथील कातकरी वस्तीसाठी बांधलेल्या घरकुलांसाठी सन्मान प्राप्त झाला.
- अरूण चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती देवगड