श्रीवर्धनमधील किनारा भकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीवर्धनमधील किनारा भकास
श्रीवर्धनमधील किनारा भकास

श्रीवर्धनमधील किनारा भकास

sakal_logo
By

श्रीवर्धनमधील किनारा भकास
अलिबाग ः रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांच्या पसंतीत उतरतात. नारळी पोफळीच्या बागा, रूचकर पारंपरिक खाद्यसंस्‍कृती पर्यटकांना आकर्षित करतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्‍या श्रीवर्धनमध्येही पर्यटनाला चालना देण्यासाठी चार वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. कोट्यवधींचा खर्च करून याठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे पर्यटकांचा ओघही वाढला होता.मात्र निसर्ग चक्रीवादळाने सुशोभित केलेल्‍या किनाऱ्याची दुरवस्‍था केली आहे. किनाऱ्यालगतच्या पायऱ्यांवर बसवलेल्‍या लाद्या तुटल्‍या आहेत. कपडे बदलण्यासाठी असलेल्‍या कंटेनर केबिनही गंजले आहे. पथ दिवे बंद असल्‍याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्‍य पसरत असल्‍याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. समुद्रकिनारी पर्यटकांसह स्थानिकांसाठी केलेल्‍या आसनव्यवस्‍थेचीही मोडतोड झाली आहे. किनाऱ्याने विद्रूपीकरण झाल्‍याचे पर्यटकांची संख्याही कमी झाल्‍याचे स्‍थानिक व्यावसायिक सांगतात.
---
ठाकरी मिरचीचा बाजारत ठसका
पाली ः जिल्ह्यात ठाकूर, आदिवासी बांधवांकडून डोंगर-उतारावर भाजीपाला लागवड केली जाते. यात प्रामुख्‍याने ठाकरी मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून हे पारंपरिक वाण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचा तिखटपणा, वैद्यकीय गुणधर्म आणि अनोख्या चवीमुळे मिरचीला ग्राहकांकडून मागणीही खूप आहे. रायगड जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. उदरनिर्वाहासाठी आदिवासी बांधव लाकूडतोड, मजुरीबरोबरच डोंगर- उतारावर लाल मातीमध्ये गावठी पालेभाज्या, काकडी, भोपळा व मिरचीचे पीक घेतात. जूनमध्ये पावसाच्या पाण्यावर ठाकरी मिरचीच्या गावठी वाणाची लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते. सध्या ठाकरी मिरचीचे भरघोस पीक आले असून गाव, तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी आदिवासी महिला गावठी भाज्यांसह गावठी ठाकरी मिरची विक्रीसाठी येत आहेत. वाट्याला दहा रुपये भाव असून त्यात साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम मिरची येते.
---
एसटीचे वेळापत्रक कोलमडले
पेण : कोरोना काळात एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. तर त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जवळपास सात-आठ महिने एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकजण लालपरीपासून दूर गेले. संप मिटल्यानंतर लालपरीची सेवा सुरू झाली खरी, पण पेण तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीचे वेळापत्रक पुरते कोलमडले. बस वेळेवर येत नसल्याने गाव-खेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होत आहे. पेण तालुक्यातील पूर्व विभागात गाव खेड्यांपर्यंत सुरू असलेली एसटी आता बंद झाली आहे. याशिवाय अनेक फेऱ्या कमी केल्‍या आहेत. शिवाय अनेक बस रस्‍त्‍यातच नादुरुस्‍त होतात, तर ज्‍या फेऱ्या सुरू आहेत, त्‍या वेळेवर धावत नसल्‍याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहे.
--
विक्रेत्‍यांना आर्थिक मदत
म्हसळा : शहरात पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिकदृष्‍ट्या स्वावलंबी करण्यासाठी नगरपंचायतीने प्रधानमंत्री स्वनिधी विशेष योजना हाती घेतली आहे. योजनेचा जास्तीत जास्त विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी आयोजित महामेळाव्यात केले. मेळाव्यात नगराध्यक्ष असहल कादिरी, उपनगराध्यक्ष सुनील शेडगे, गटनेते संजय कर्णिक, नगर सेवक संजय दिवेकर आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योजनेंतर्गत विक्रेत्यांना तीन टप्प्यांत अल्प दरात कर्ज वाटप करण्यात येते. पहिल्या टप्प्यात १० हजार, दुसऱ्या टप्प्यात २० हजार आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार इतक्या रकमांचे कर्ज वितरित करण्यात येते. आतापर्यंत म्हसळा शहरातील ३० पथ विक्रेत्यांना कर्ज वितरित करण्यात आले असून चार जणांना दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मंजूर झाल्‍याची माहिती उकिर्डे यांनी दिली.