गुहागर-सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर करू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर करू नका
गुहागर-सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर करू नका

गुहागर-सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर करू नका

sakal_logo
By

rat२८p४.jpg-
६५१५५
गुहागरः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयपीएस अधिकारी स्वप्नील माने.
-------------
सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर करू नका
आयपीएस अधिकारी स्वप्नील माने ; कॉलेजपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करा
गुहागर, ता. २८ ः शिक्षण घेताना आपले आदर्श हे आपले आई-वडील, गुरूजन किंवा महान व्यक्तिमत्वच असावे. कॉलेज जीवनापासून आपली स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास भविष्यात चांगले यश मिळू शकते. सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर यामुळे विद्यार्थी आपल्या ध्येयापासून बाजूला जात आहेत. त्यामुळे गुणवत्ता असूनदेखील हुशार विद्यार्थी मागे पडतो. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर अधिक सजगपणे करावा. स्पर्धा परीक्षा देताना सुरवातीला अपयश येऊ शकते; परंतु त्यावर मात करून प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळू शकते, असे आयपीएस अधिकारी स्वप्नील माने यांनी सांगितले.
पाटपन्हाळे कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात वाणिज्य मंडळ आणि करिअर गाईडन्स विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासंदर्भात एकदिवसीय सेमिनार झाले. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या परीक्षेत आयपीएस म्हणून उत्तीर्ण झालेले स्वप्नील माने आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले व सध्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे लेखाधिकारी म्हणून कार्यरत असणारे उमेश मगदूम उपस्थित होते.
सेमिनारच्या सुरवातीला मगदूम यांनी स्पर्धा परीक्षांचे स्वरूप कसे असते व विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे तयारी करावी, हे सांगितले. त्यांनी आपला प्रवास छोट्याशा खेडेगावातून सुरू केला व अत्युच्च अशा शिखरावर कशाप्रकारे जाऊन पोहोचले तसेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असूनदेखील कशा प्रकारे यश मिळवले हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणाली देर्देकर हिने तर समारोप कोमल झिंबर हिने केला. या वेळी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, प्राचार्य देसाई, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. खोत, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. सनये, भागवत, महाविद्यालयाचा जीएस प्रणव टाणकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
---------
चौकट
फळविक्रेता ते आयपीएस अधिकारी
आयपीएस अधिकारी स्वप्निल माने यांनी आपले प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण कसे पार पाडले याची माहिती देताना घरच्या अडचणीमुळे कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, याची माहिती दिली. आर्थिक अडचणींमुळे पैशासाठी फळविक्रीच्या स्टॉलवरदेखील काम करून आपण आपले शिक्षण कसे पूर्ण केले याची माहिती देऊन फळविक्रेता ते आयपीएस अधिकारी असा आपला प्रवास कसा झाला हे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यश मिळणार नाही, हे स्पष्ट केले.