
इच्छूक उमेदवार पहिल्या दिवशी गोंधळलेल्या अवस्थेत
इच्छुक उमेदवार पहिल्या
दिवशी गोंधळलेल्या अवस्थेत
ग्रामपंचायत निवडणूक ; 22 अटींशर्तींची हवी पूर्तता
चिपळूण, ता. 28 ः तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना 22 अटीशर्तींची पूर्तता करावी लागणार असल्यामुळे पहिल्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
येथील पंचायत समितीत पहिल्या दिवशी भरलेले उमेदवारी अर्ज दाखल करून घेणाऱ्यांपेक्षा शंका घेऊन येणाऱ्यांची संख्या जास्त होती. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत 22 कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. उमेदवारी अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या पंचायत इलेक्शन महाराष्ट्र जीओव्हीईन या वेबसाइटवर भरून त्याची उमेदवारांना प्रिंटआऊट काढावी लागणार आहे. त्यावर स्वाक्षरी करून ते अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावे लागणार आहेत. अर्ज स्वीकारण्यासाठी येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या गटाचे नेते शंका घेऊन येताना दिसले. एका उमेदवाराला किती प्रभागात अर्ज करता येईल. आरक्षण असलेल्या जागेत अर्ज भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत. जुने बॅंक खाती चालणार आहेत का, उमेदवाराचे जिल्हा आणि अर्बन बॅंकेत खाती आहेत ती चालतील का, चार नमुना सही करताना एकाच प्रकारच्या करायच्या की वेगवगळ्या प्रकारच्या करायच्या. फोटो कलर पाहिजे की ब्लॅक अॅण्ड व्हाईट चालतील. आपला अर्ज ऑनलाईन भरताना तो चुकू नये यासाठी सर्व शंकांचे निरसन करून घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करताना जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत त्याची यादी तयार करण्यात आली आहे. त्याची छायांकित प्रत अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना दिली जात होती.
-------------
कोट
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आणि अर्ज दाखल झाल्यानंतर कोणत्या समस्या निर्माण होतात याची पूर्वकल्पना असल्यामुळे त्याची तयारी आम्ही केली आहे. उमेदवार आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ वाचावा यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
- तानाजी शेजाळ, प्रभारी तहसीलदार, चिपळूण