
गुहागरमध्ये रानरेडे, वानरांचा उच्छाद
rat28p5.jpg
65156
गुहागरः पालपेणे येथे दिसलेला रानरेडा.
--------------
गुहागरमध्ये रानरेडे, वानरांचा उच्छाद
शेतकरी हैराण ; भातशेतीसह रब्बी पिकाचेही नुकसान
गुहागर, ता. २८ः गुहागरमधील अनेक ग्रामीण भागात रानरेडे आणि वानरांच्या वाढत्या उपद्रवाने तालुक्यातील बागायतदार आणि शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास रानरेडे हिरावून घेत असल्याच्या हजारो तक्रारी प्रशासनाकडे जात आहेत; मात्र यावर कायमचा उपाय काय, असा संतप्त सवाल करत केरळ राज्याच्या धर्तीवर राज्यातही वानर आणि रानरेड्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वाढत्या जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. अशा असंख्य घटना दिवसागणिक समोर येत आहेत; मात्र यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. एरवी हंगामी शेती करून पावटा, कुळीथ, तूर यांसह विविध प्रकारच्या भाज्यांची बागायत करणारे शेतकरी रानरेडे आणि वानरांच्या उपद्रवामुळे मागील सात ते आठ वर्षात भातशेती करण्यासाठीदेखील धास्तावले असल्याचे चित्र घटलेल्या शेतीक्षेत्रामुळे स्पष्ट होत आहे. यात प्रामुख्याने कोतळुक, वेळंब, कौंढर, मळण या गावात तर आता हंगामी शेतीच दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे वानर आणि रानरेडे यांच्याबाबतीत राज्य सरकारने कायमचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रानरेडे किंवा अन्य जंगली प्राण्यांनी शेती किंवा फळझाडांचे नुकसान केले तर एका झाडाला सरकारकडून पाचशे रुपये दिले जातात. त्यात शेतकऱ्याचे मोठं नुकसान होतं. बागायतीसाठी लाखो रुपये खर्च करूनदेखील त्यातून काहीही नफा न येता प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बागायतदारदेखील प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. रविवारी पालपेणे येथील मधली वाडीमध्ये जंगलात रानरेडा दिसून आल्यामुळे या भागातील बागायतदारदेखील चिंतेत असून येथील युवा उद्योजक उमेश खैर यांनी वस्तीच्या शेजारी बिनधास्तपणे वावरणाऱ्या रानरेड्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून जीवापलीकडे जपलेल्या बागायतीबाबत चिंता व्यक्त केली.