कर्नाटक सरकारचे षड्‍यंत्र हाणून पाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटक सरकारचे षड्‍यंत्र हाणून पाडू
कर्नाटक सरकारचे षड्‍यंत्र हाणून पाडू

कर्नाटक सरकारचे षड्‍यंत्र हाणून पाडू

sakal_logo
By

65244
सावंतवाडी : सर्व पक्षीयांच्या विचार विनिमय बैठकीत उपस्थित अण्णा केसरकर, बबन साळगावकर, अपर्णा कोठावळे आदी (छायाचित्र ः रुपेश हिराप)

कर्नाटक सरकारचे षड्‍यंत्र हाणून पाडू

सर्वपक्षीयांची बैठक; सावंतवाडीत तरुणांमध्ये जनजागृतीचे आवाहन

सावंतवाडी, ता. २८ ः महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी सुरू असलेले कर्नाटक सरकारचे षड्यंत्र आता हाणून पाडायचे आहे. त्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना पुढे आणा, असे आवाहन आज येथे झालेल्या सर्वपक्षीयांच्या विचार विनिमय बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले. या सर्व प्रकाराला केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्रातील नेते थोर पुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, रवी जाधव, अमोल सारंग आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जाहीर निषेधाचा ठराव साळगावकर यांनी मांडला. तर राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांबाबत कोणतीही दखल न घेणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या निषेधाचा ठराव कोरगावकर यांनी मांडला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नेमण्यात आलेल्या राज्यस्तरीय कमिटीत ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांना सामावून घ्यावे, असाही ठराव एकमताने घेण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सिंधुदुर्गात तालुकास्तरीय कमिट्या स्थापन कराव्यात, यासाठी अध्यक्ष केसरकर यांनी पुढाकार घ्यावा, असा ठराव रवी जाधव यांनी मांडला. या सर्व ठरावांना उपस्थितांनी एकमताने अनुमोदन दिले.
दरम्यान, केंद्रातील नेते महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये करून जनतेचे लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्यावरही राज्यातील नेते चिडीचूप आहेत. त्यामुळे महाराष्ट्र वाचविण्यासाठी सर्वपक्षीयांसह तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने बैठकीस उपस्थित सर्वांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्राचे लचके तोंडण्याचा सुरू असलेला प्रयत्न सर्वांनी तरुणांसमोर प्रकर्षाने मांडावा आणि या लढ्यात त्यांना सामावून घ्यावे, असे आवाहन केसरकर यांनी केले.
---
लाचार नेते गप्पच
केसरकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादासंदर्भात आतापर्यंत शेकडो हुतात्मे झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांचा हा लढा आहे. आता कर्नाटकातील सरकार सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट यावर आपला दावा सांगत आहे. तसे वक्तव्य कर्नाटक नेत्यांकडून होत आहे. हा सर्व प्रकार म्हणजे मराठी माणसाची गळचेपी आणि महाराष्ट्राचे लचके तोडण्यासारखाच आहे; मात्र सत्तेसाठी लाचार झालेले राज्यातील नेते त्यावर कोणतीही भूमिका घेत नाहीत, हे दुर्दैव आहे.’’