
एसटीच्या समस्यांबाबत वाहतूक निरीक्षकांशी चर्चा
65274
देवगड ः येथील सहायक वाहतूक निरीक्षक लहू सरवदे यांची भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
देवगडात एसटीच्या फेऱ्या
उशिरा; विद्यार्थ्यांची गैरसोय
भाजपची खंत; आगाराचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना येणाऱ्या विविध समस्यांच्या अनुषंगाने तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी येथील आगाराला भेट दिली. एसटीचे सहायक वाहतूक निरीक्षक लहू सरवदे यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आगारातून शालेय बसफेऱ्या उशिराने धावत असल्याने विद्यार्थ्यांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो, असे यावेळी सांगण्यात आले. याबाबत आवश्यक काळजी घेतली जाईल, असे श्री. सरवदे यांनी शिष्टमंडळास सांगितले.
प्रवाशांच्या तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीच्या अनुषंगाने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगाराला भेट दिली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, वैभव करंगुटकर, अंकुश ठुकरूल यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह काही पालक उपस्थित होते. वानिवडे भागातील तसेच त्या मार्गावरील विद्यार्थ्यांना एसटी फेरी उशिरा सुटत असल्याने गैरसोय सोसावी लागते. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी सहायक वाहतूक निरीक्षक लहू सरवदे यांची भेट घेऊन यामध्ये सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याबाबत चर्चा केली. याबाबत सकारात्मक बदल करण्याचे श्री. सरवदे यांनी शिष्टमंडास आश्वासित केले.